संगमनेरातील पद्मनगरमध्ये दोन कुटुंबांत तुफान धुमश्चक्री! दोन महिलांसह चार जखमी; परस्पर विरोधी तक्रारींवरुन आठ जणांवर गुन्हा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चाकरमान्यांचा शांत निवासी परिसर म्हणून ओळखल्या जाणार्या पद्मनगरमध्ये मंगळवारी (ता.२६) दुपारी दोन कुटुंबात तुफान धुमश्चक्री उडाली. किरकोळ कारणावरुन दोन्ही बाजूकडील मंडळींनी आपला संयम गमावला आणि हॉकी स्टिक, क्रिकेट बॅट, लोखंडी रॉड, गज अशी हत्यारे घेवून दोन्ही कुटुंबीय एकमेकांना भिडले. या हाणामारीत दोन्ही बाजूकडील प्रत्येकी एका महिलेसह चौघे जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिराने दोन्ही शेजार्यांनी एकमेकांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एका कुटुंबाने जीवघेण्या शस्त्रांचा वापर केल्याने त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, त्यात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष एकमेकांच्या शेजारी राहणारे, रोज एकमेकांचे चेहरे पाहणारे हे दोन्ही कुटुंब मंगळवारच्या घटनेने आता एकमेकांपासून कायमस्वरुपी दुरावले आहेत. विज्ञानाच्या जगात संवादाचा अभाव आणि त्यातून गमावत चाललेला संयमही या घटनेतून ठळकपणे समोर आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास चाकरमान्यांची शांत निवासी वसाहत म्हणून ओळखल्या जाणार्या पद्मनगरमध्ये घडला. या वसाहतीत एकमेकांच्या शेजारी असलेल्या उडता व रच्चा या दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला. यातील उमा अंबादास रच्चा यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या घरातील लोखंडी प्रवेशद्वाराचे काम सुरु असताना शेजारी राहणारा नरेश उडता हा तरुण ‘तुम्ही गेट बनवायचे नाही, ही जागा तुमच्या बापाची आहे का?’ असे म्हणत त्याने विकास अंबादास रच्चा व साई विजय आडेप या दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्या दोघांना मारहाणीतून वाचवण्यासाठी उमा रच्चा (वय ५३) यांनी धाव घेतली असता रवींद्र उडता याने लाकडी बॅट घेवून व ऋषीकेश सोमा याने लोखंडी गज घेवून मारहाण करीत दुखापत केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी रवींद्र हिरालाल उडता, नरेश हिरालाल उडता, ऋषीकेश संतोष सोमा, मयुरी नरेश उडता, अनिता रवींद्र उडता व ऋतुजा संतोष सोमा (सर्व रा. पद्मनगर) अशा एकूण सहा जणांवर मारक शस्त्रांचा वापर करुन मारहाण केल्याच्या कलम ३२४ सह ३२३, १४३, १४७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कलमान्वये गुन्हा दाखल झालेल्या आरेापींना अटक केली जात नाही, मात्र तपासकामी पोलीस जेव्हाही लेखी निर्देश देतील त्यावेळी त्यांच्यासमोर हजर व्हावे लागेल. दोष सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भोगावा लागू शकतो.
याप्रकरणी रवींद्र हिरालाल उडता यानेही फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शेजारी राहणार्या रच्चा यांच्या लोखंडी प्रवेशद्वाराचे काम सुरु असताना दोन्ही कुटुंबांत त्यावरुन शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाल्याने विकास अंबादास रच्चा व साई विजय आडेप या दोघांनी हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने उडता कुटुंबावर हल्ला केला. या हाणामारीत रवींद्र उडता, राधाबाई उडता व ऋषीकेश उडता (सर्व रा. पद्मनगर) या तिघांना गंभीर दुखापत झाली. रवींद्र उडता याने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जवाबावरुन विकास रच्चा व साई आडेप या दोघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता असून त्यांना काही दिवस कोठडीत घालवावे लागतील. या कलमान्वये दोष सिद्ध झाल्यास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होवू शकते. या घटनेने आजच्या विज्ञान युगात माणसांमधील संवाद संपुष्टात येवून त्यांच्यातील संयमाचाही अंत होत असल्याचे चित्र दाखवले आहे. एकाच समाजातील वर्षोनुवर्ष शेजारी राहणार्या कुटुंबांमध्ये अगदीच किरकोळ कारणावरुन झालेला हा वाद कायद्याच्या कक्षेत आल्याने त्याची परिणीती या दोन सख्ख्या शेजार्यांना आयुष्यभर एकमेकांपासून दूर नेण्यात होणार आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या बाबतीत नेहमी म्हणत; एकवेळ मित्र बदलता येतील, परंतु शेजारी कधी बदलता येत नाहीत. अशीच स्थिती पद्मनगरच्या या घटनेत दिसून येते. दररोज ज्यांना पहायचे आहे, त्यांच्याशी संवादातून सरळ मार्ग समोर असतांनाही घडलेला हा प्रसंग या दोन्ही कुटुंबांना एकमेकांपासून दुरावण्यासह न्यायालयीन लढाईच्या मैदानात घेवून जाणारा आहे. त्याचे परिणामही समाज व्यवस्थेसाठी पोषक ठरणार नाहीत. समाजधुरिणांनी स्वतः याची दखल घेवून यातून मध्यम मार्ग काढण्याची गरज परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.