बसस्थानकाजवळील अनधिकृत रिक्षाथांबा कायमस्वरुपी बंद करा! वीर एकलव्य संघटनेचे निवेदन; विद्यार्थीनींच्या मजबुरीचा गैरफायदा घेत असल्याचाही उल्लेख..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपूर्ण कागदपत्रे, प्रवासी परवान्याची कमतरता असूनही बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांकडून महिला व मुलींच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला जात आहे. असंख्य रिक्षाचालकांनी मिळून बसस्थानकाजवळ अकोल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर अनधिकृत थांबा तयार केला आहे. त्यामुळे या भागातील बेशिस्तीत मोठी वाढ झाली असून वारंवार वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील हा बेकायदा रिक्षाथांबा कामस्वरुपी बंद करावा व शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षांचे परवाने तपासावेत अशा आशयाच्या मागणीचे निवेदन वीर एकलव्य आदिवासी संघटनेच्यावतीने श्रीरामपूरच्या प्रादेशिक परिवहन निरीक्षकांना देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत या निवेदनावर कारवाई न झाल्यास संघटना आपल्या पद्धतीने कारवाई करील असा इशाराही यातून देण्यात आला आहे.

याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, हॉटेल काश्मिरच्या समोरील बाजूने अकोल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर मागील तीस वर्षांपासून हा बेकायदा रिक्षा थांबा कार्यरत आहे. या थांब्यावर उभ्या राहणार्‍या रिक्षांची मोठी संख्या आहे. त्यातच येथील रिक्षाचालकांना राजकीय आशीर्वाद प्राप्त असल्याने त्यांची मुजोरीही मोठ्या प्रमाणात वाढली असून भररस्त्यात रिक्षा उभ्या करणे, वाट्टेल तशा पद्धतीने रिक्षा चालवणे, प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून त्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणे असे प्रकार येथे नियमित घडत आहेत.


अनेकदा या रिक्षाचालकांमध्ये क्रमांकावरुनही वादंग निर्माण होतात व त्याचा फटका या रस्त्यावरुन जाणार्‍यांना होत असतो. येथील अनेक रिक्षाचालकांनी आपल्या वाहनांमध्ये बेकायदा पद्धतीने गॅसकीट बसवलेली असून त्यातून एखादी गंभीर दुर्घटना घडण्याचीही नेहमीच शक्यता असते. हा रस्ता आधीच अरुंद असून अकोल्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वारंवार या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबाही होत असतो. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक येथील रिक्षाचालकांना नसते, त्यावरुन त्यांची दादागिरीही अधोरेखीत होत असल्याचे या निवदेनातून सांगण्यात आले आहे. यापूर्वी काही पोलीस अधिकार्‍यांनी सदरचा रिक्षा थांबा हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने त्यावेळी कारवाई पूर्ण होवू शकली नाही.

पुणे, नाशिक अथवा अन्य शहरात बाद करण्यात आलेल्या जुन्या व खराब अवस्थेतील रिक्षा भंगारातून आणल्या जातात व त्यांचा वापर प्रवाशी वाहण्यासाठी करण्यात येतो. येथील रिक्षा थांब्यावरुन घुलेवाडी अथवा त्या भागात जाणार्‍या प्रवाशांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. त्यामुळे येथील रिक्षाचालक आसन क्षमतेच्या तिप्पट प्रवाशी कोंबून त्यांची अक्षरशः जनावरांसारखी वाहतूक करतात. त्यातच काही रिक्षाचालक जाणीवपूर्वक महिला अथवा विद्यार्थीनींना पुढच्या सीटवर बसवतात व प्रवासादरम्यान त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेवून चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र आजवर या रिक्षा चालकां विरोधात कारवाई न झाल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावले असून त्यातून एखादी गंभीर स्वरुपाची घटना घडण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचे सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हंटले आहे.

मुंबई, पुणे व ठाण्यात गेल्या काही दिवसांत अशाप्रकारच्या काही रिक्षाचालकांकडून विद्यार्थीनींना छेडण्याच्या एकामागून एक घटना समोर आल्या आहेत. त्यात रिक्षाचालकांचे अश्लील हावभाव व शब्द ऐकून घाबरलेल्या महिलांनी थेट चालू रिक्षातून उड्या घेतल्याचेही प्रसारमाध्यमातून संपूर्ण राज्याने पाहिले आहे, असे असतानाही संगमनेरातील अशाप्रकारच्या रिक्षाचालकांना अभय देण्यामागे पोलिसांचे धोरण काय? असा सवाल उपस्थित करीत येत्या आठ दिवसांत सदरचा रिक्षा थांबा कायमस्वरुपी बंद करुन संगमनेरातील अनधिकृत रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी न केल्यास वीर एकलव्य संघटना आपल्या पद्धतीने सदरचा रिक्षा थांबा बंद करील, त्यानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक व संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या आहेत.


सदरच्या रिक्षा थांब्याबाबत यापूर्वीही अनेकदा सामान्य नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र केवळ राजकीय वरद प्राप्त असल्याने आजवर ‘त्या’ सामान्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. सध्या वसईच्या श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण राज्यात आक्रोश व्यक्त होत असताना संगमनेरातील महिला व विद्यार्थीनींची अशाप्रकारे वाहतूक करुन त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला जात असल्याचे प्रकारही चर्चेत आल्याने वीर एकलव्य आदिवासी संघटनेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकार थांबवण्यासाठी बेकायदा रिक्षा व त्यांनी निर्माण केलेले थांबे उध्वस्त करण्याची मागणी केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानेही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

Visits: 50 Today: 1 Total: 435076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *