संगमनेरच्या उद्योजिकेस दोन प्रकरणात कारावासाची शिक्षा! पावणे पाच लाखांचा दंड भरण्याचे आदेश; जिल्हा न्यायालयात अपिलाचीही संधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यवसायासाठी आर्थिक संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमीत फेड केली नाही, वारंवार तगादा केल्यानंतर दिलेला धनादेशही खात्यात शिल्लक नसल्याने वठला नाही या कारणावरुन संगमनेरातील स्पृहा कलेक्शन या सुपरिचित वस्त्र दालनाच्या संचालिका मीता आशिष संवत्सरकर यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात प्रत्येकी चार महिन्यांचा कारावास आणि 4 लाख 75 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत भरपाईची रक्कम न भरल्यास अतिरीक्त प्रत्येकी दोन महिन्यांचा कारावासही सुनावण्यात आला आहे. संबंधित महिलेने यातील दीड लाखांची रक्कम न्यायालयासमोर जमा केली असून उर्वरीत रक्कम पुढील सहा दिवसांत भरावी लागणार आहे. या दरम्यान त्यांना महानगर दंडाधिकार्यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात अपील करण्याचीही संधी प्राप्त झाली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार यूनियन बँक ऑफ इंडिया (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक) या बँकेच्या संगमनेर शाखेतून संगमनेरातील सुपरिचित असलेल्या स्पृहा कलेक्शन या महिलांच्या वस्त्रांचे दालन चालवणार्या मीता आशिष संवत्सरकर यांनी साडेसात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेल्या या कर्जाची त्यांच्याकडून नियमित मासिक हप्त्यात परतफेड होणे अपेक्षित असताना त्यांनी त्यात सातत्याने दिरंगाई केल्याने त्यांचे खाते थकबाकीदारांच्या यादीत आले. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून त्यांच्याकडे एकसारखा तगादा सुरु होता.
![]()
या दरम्यान त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या काही रकमेचा भरणा करण्याची तयारी दाखवताना बँकेच्या वसुली पथकाला दोन स्वतंत्र धनादेश दिले होते. बँकेने ठरल्या तारखेला ते खात्यात भरले असता ‘खात्यात पैसे नसल्याच्या’ कारणाने ते न वठताच परत आले. सदरचे धनादेश देताना संबंधित बँकेने ते वठतील, न वठल्यास होणार्या कायदेशीर कारवाईस तयार राहील असा मजकूर त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेतला होता. त्यामुळे बँकेने संबंधित कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेत सदरचे प्रकरण संगमनेरच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकार्यांच्या न्यायालयात दाखल केले. यावेळी बँकेकडून जोरदार युक्तीवाद करताना अॅड. व्ही. आर. पगारे यांनी विविध दाखल्यांसह सदरची रक्कम परतफेड करण्यासाठी कर्जदाराला वारंवार देण्यात आलेली संधी आणि त्यांच्याकडून थकीत कर्जाच्या रकमेपोटी धनादेश स्वीकारताना घेतलेले लेखी म्हणणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

बँकेचा युक्तीवाद मान्य करीत अतिरिक्त महानगर दंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पुरकर यांनी स्पृहा कलेक्शनच्या संचालिका मीता आशिष संवत्सरकर यांना दोषी धरुन चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम 138 अन्वये दोन्ही प्रकरणात प्रत्येकी चार महिन्याच्या कारवासाची शिक्षा सुनावली. तसेच यूनियन बँकेला (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक) पुढील सात दिवसांत 2 लाख 50 हजार व 2 लाख 25 हजार अशी एकूण 4 लाख 75 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले. मुदतीत भरपाई रकमेचा भरणा न केल्यास दोन्ही प्रकरणात अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावासही सुनावण्यात आला. यातील 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम त्यांनी त्याच दिवशी न्यायालयासमोर जमा केली असून उर्वरीत रक्कम न्यायालयाने दिलेल्या मुदतीत भरण्याची तयारी दाखवली आहे. त्यासोबतच या दरम्यानच्या कालावधीत महानगर दंडाधिकार्यांच्या निर्णयाविरोधात त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात अपील करण्याचीही संधी मिळाली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात येवूनही त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात बँकेच्यावतीने अॅड. व्ही. आर. पगारे यांनी काम पाहिले, त्यांना अॅड. किरण रोहोम, अॅड. पल्लवी निकाळे, अॅड. सुनीता जाधव, प्रशांत बोबडे व बँकेचे व्यवस्थापक समाधान पवार यांनी सहाय्य केले.
