रौप्य महोत्सवी रामनवमी उत्सव ऐतिहासिक ठरणार ः कोते यात्रौत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलाकर कोते यांची निवड
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा रामनवमी यात्रौत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलाकर कोते यांची बिनविरोध निवड झाली असून यंदा रामनवमी उत्सवास सव्वाशे वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शतकोत्तर रौप्य महोत्सवी रामनवमी उत्सव ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष कमलाकर कोते यांनी व्यक्त केला.
शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. रामनवमी उत्सवास 1897 मध्ये सुरुवात करण्यात आली. 10 एप्रिल, 2022 मध्ये साजरी होणार्या रामनवमी उत्सवाचे यंदाचे हे 125 वे वर्ष आहे. तीन दिवसीय सुरू असणारा हा अभूतपूर्व सोहळा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोठी पर्वणी असते. त्यातच मागील दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे रामनवमी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र देशात कोविडची लाट ओसरल्यानंतर सरकारने कोविडचे सर्व नियम, अटी, शर्ती शिथील केल्या आहेत. त्यामुळे यंदाचा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने बुधवारी (ता.23) यात्रा समितीच्या अध्यक्षपदासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कैलासबापू कोते, दिगंबर कोते, भानुदास गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, मधुकर कोते, रमेश गोंदकर, तुकाराम गोंदकर, केशव गायके, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, महेंद्र शेळके, सुधाकर शिंदे, आप्पासाहेब कोते, विनायक कोते, हौशीराम कोते, प्रताप जगताप, देवराम सजन, प्रमोद नागरे, वसंत शेळके, यशवंत गायके, बाबासाहेब कोते, दादासाहेब गोंदकर, विजय कोते, नीलेश कोते, नितीन शेळके, नानासाहेब काटकर, डॉ. एकनाथ गोंदकर, अॅड. अनिल शेजवळ, अॅड. अविनाश शेजवळ, सलीम शेख, मंगेश त्रिभुवन, नवनाथ कोते, संदीप पारख, राजेंद्र शिंदे, अजित पारख, अशोक कोते, जितेंद्र शेळके, संजय त्रिभुवन, उत्तम कोते, राजेंद्र कोते, दिनकर कोते, विकास कोते, प्रमोद गोंदकर, अविनाश गोंदकर, दत्तात्रय कोते, नितीन कोते, सचिन तांबे, विजय कोते, अरविंद कोते, ताराचंद कोते, गणेश गोंदकर आदी उपस्थित होते. यावेळी यात्रेत प्रामुख्याने बैलगाडा शर्यत, साईकेसरी कुस्ती स्पर्धा, फूड फेस्टिव्हल, सुप्रसिद्ध लावण्या, तमाशा, नाटक, ऑर्केस्टा, एक एकर जागेत लक्षवेधी अशी श्री साईबाबांच्या प्रतिमेची रांगोळी, शिर्डी गावातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या अधिकार्यांना साईरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.