बेकायदा गोवंश कत्तलखान्यासाठी चोरीची वीज! संगमनेरातील अजब प्रकार; महावितरण कंपनीला सव्वा लाखांचा चुना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांच्या बदलत्या जागा, जनावरांची तस्करी, कापलेल्या गोमांसाची वाहतूक, पोलिसांची कारवाई आणि पकडलेले पंटर असे वेगवेगळे किस्से नेहमीच चर्चेत असतात. यावेळी मात्र येथील कत्तलखान्यांमधून अजबच प्रकार समोर आला असून चक्क बेकायदा कत्तलखान्यासाठी दोघा कसायांनी वीजजोडही चोरुन घेतल्याचे उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांच्या छाप्यातूनच उघड झालेल्या या प्रकारानंतर संबंधित वीजचोरांना कायदेशीर नोटिसा बजावूनही त्यांनी १ लाख २९ हजार ५४२ रुपयांचा दंड भरला नाही, त्यामुळे अखेर जोर्वे विभागाच्या कक्ष अभियंत्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी जमजम कॉलनीतील दोघा कसायांविरोधात भारतीय विद्युत अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी ११ ऑक्टोबररोजी उघड झाला होता. त्यावेळी सरकार लॉन्स, जमजम कॉलनी परिसरात असलेल्या एका कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा घातला होता. यावेळी कत्तलखान्यात सुरु असलेला वीजप्रवाह थेट लगतच्या रोहित्रावर वायर टाकून घेतला गेल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. याबाबतची माहिती त्यांनी शहर विभागाचे अभियंता राजेंद्र शिंदे यांना दिल्यानंतर त्यांनी जोर्वे विभागाचे कक्ष अभियंता तथा सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांना कारवाईचे आदेश देत घटनास्थळी पाठवले.

यावेळी उपाध्ये यांनी आपल्या पथकासह जमजम कॉलनीतील ‘त्या’ कत्तलखान्याच्या परिसरात जावून पाहणी केली असता सगळा ‘झोल’ उघड झाला. यावेळी वीज कंपनीच्या पथकाने केलेल्या पाहणीत बाजूच्या नाना गुंजाळ यांच्या रोहित्रावरुन सुमारे शंभर मीटर लांबीची वायर टाकून सदरील कत्तलखान्यात वीजप्रवाह आणल्याचे आढळले. विशेष म्हणजे ज्या जागेत सदरचा बेकायदा कत्तलखाना सुरु होता, तेथे अधिकृत वीजजोड घेतलेलेही दिसून आले. मात्र त्या जोडवर आतील केवळ १५ वॅटचे दोन बल्बच असल्याने त्याचे बिलही नगण्य येत होते.

तर, रोहित्रावरुन घेण्यात आलेल्या बेकायदा वीजजोडावर कत्तलखान्यातील १५ वॅट पॉवरचे सहा बल्ब, ६० वॅट पॉवरचे दोन पंखे आणि २ हजार २०० वॅटची बोअरींगसाठी वापरली जाणारी मोटर यांचा भार टाकण्यात आल्याचे पथकाने पाहिले. या सर्वांचे मूल्यमापन करता संबंधित कसायांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला अंधारात ठेवून सदर रोहित्रावरुन बेकायदा जोड घेवून कंपनीची २ हजार ३८० यूनिटची चोरी केल्याचे सिद्ध झाले. विद्युत कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार या वापरापोटी होणारी १ लाख २९ हजार ५४२ रुपयांची दंडात्मक रक्कम भरण्यासाठी सदरील जागेच्या मालकांना नोटीसाही बजावण्यात आल्या.

मात्र गेल्या दोन महिन्यांत संबंधित कसायांनी एक रुपयाही जमा करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे अखेर संगमनेरच्या वीज वितरण कंपनीने त्या दोघाही कसायांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जोर्वे उपविभागाचे कक्ष अभियंता सुजय उपाध्ये यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शाहीद इर्शाद कुरेशी व जहीर इर्शाद कुरेशी (दोघेही रा. सुकेवाडी) यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियमाच्या (सुधारित) तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने संगमनेरातील गोवंश कत्तलखाने आणि त्यांचे वेगवेगळे किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कारवाईने संगमनेरच्या कसायांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


दोन महिन्यांपूर्वी संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनीतील याच कत्तलखान्यावर छापा घातला होता. त्यावेळी कारवाई दरम्यान सदर कत्तलखान्यासाठी चोरुन वीज घेतली गेल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यावरुन पोलिसांनी वीज वितरण कंपनीचे शहर अभियंता राजेंद्र शिंदे यांना कळविल्यानंतर त्यांनी जोर्वेच्या कक्ष अभियंत्यासह आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यातून २ हजार ३८० वॅटची वीजचोरी उघड झाली असून वितरण कंपनीने १ लाख २९ हजार ५४२ रुपयांच्या वसुलीसाठी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 23143

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *