अपघातग्रस्त टेम्पो एकदिवस आधी होता पोलीस कस्टडीत? हप्तेखोरीतून परस्पर सोडून दिल्याची चर्चा; ‘धांदरफळ’ प्रकरणात संगमनेर पोलीस आरोपीच्या पिंजर्‍यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शनिवारी पहाटे तालुक्यातील धांदरफळ शिवारात असलेल्या शंभर फूट खोल विहिरीत पिकअप टेम्पो कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा बुडून मृत्यू झाला तर चौघे बालंबाल बचावले होते. या घटनेनंतर पोलिसांचे वाहन पाठलाग करीत असल्याने चालकाने भरधाव वेगात वाहन दामटल्यानेच अपघात घडल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता या चर्चेला कलाटणी मिळाली असून मंगळापूरच्या ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वीच चेसी क्रमांक नसलेले हे वाहन पकडून तहसीलदारांच्या स्वाधीन केल्याची आणि अपघातापूर्वी काहीतास पूर्वीपर्यंत सदरचे वाहन संगमनेर शहर पोलिसांच्या ‘कस्टडीत’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुका दंडाधिकारी आणि पोलीस निरीक्षक अशा जबाबदार पदावरील अधिकार्‍यांच्या समोर चेसी क्रमांक नसलेले ‘बेकायदा’ वाहन आल्यानंतर त्यांनी कायद्याने जी कृती करायला हवी होती ती या घटनेत मात्र टाळण्यात आली. विशेष म्हणजे शनिवारी अपघातग्रस्त होवून तरुणाचा बळी घेणारे तेच वाहन अवघ्या 24 तासांपूर्वी शहर पोलिसांच्या ‘कस्टडीत’ असल्याची नवीनच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत या अपघातास कारणीभूत ठरलेल्यांमध्ये तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या नावाची चर्चा बंद होवून आता महसूल आणि शहर पोलिसांच्या नावानं चांगभलं सुरु झालं आहे.


शनिवारी (ता.25) पहाटे साडेचारच्या सुमारास धांदरफळ शिवारातील जवळे रस्त्यावर सदरचा भीषण अपघात घडला होता. मंगळापूरमधून बेकायदा वाळूची वाहतूक करणार्‍या पिकअप टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेला हा टेम्पो काटवनवस्ती जवळील रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत जावून कोसळला होता. या भीषण अपघातात सदरचे वाहन शंभर फूट खोल आणि जवळपास सत्तर फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळल्याने त्यातून कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती. मात्र प्रसंगावधान राखून वाहनातील समीर सदाशिव मेंगाळ, सुदाम राजू वारे, सुनील महादू वारे व संतोष शिवाजी मेंगाळ या चौघांनी वाळू भरण्यासाठी वापरल्या जाणार्‍या टोकर्‍यांचा आधार घेवून पाण्यावर तरंगत आपला जीव वाचवला. काही वेळानंतर विहिरीत सोडलेल्या पाईपच्या आधाराने ते बाहेर पडले. मात्र वाहनचालक गोरख नाथा खेमनर (वय 23, सर्व रा.डिग्रस) याला बाहेर पडता आले नाही.


सदरची घटना समोर आल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या दरम्यान अपघाताची चर्चा सुरु असतांना पोलिसांचे वाहन पाठलाग करीत असल्यानेच वाहन चालकाने वेग वाढवल्याचे व त्यामुळे वाहन अनियंत्रित होवून विहिरीत कोसळल्याचे बोलले जावू लागले. दिवसभर संपूर्ण तालुक्यात हिच चर्चा सुरु असतांना यंत्रणेकडून बुडालेले वाहन बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र विहिरीची खोली अधिक असल्याने के्रनचा गळ वाहनापर्यंत पोहोचवण्यात अपयश आले. त्यावर उपाय म्हणून पट्टीच्या पोहणार्‍या काहींना नाड्यांसह पाण्यात सोडून अपघातग्रस्त वाहन के्रनच्या गळाला बांधण्याचाही प्रयत्न झाला. मात्र अधिकच्या खोलीमुळे विहिरीत प्राणवायूची कमतरता भासू लागल्याने पोहणारेही फारवेळ पाण्याखाली तग धरु शकले नाहीत.


त्याचा परिणाम सायंकाळपर्यंत वाहन बाहेर काढण्यात अपयश आल्याने शनिवारी बचावकार्य थांबवण्यात आले. रविवारी (ता.26) आपत्ती व्यवस्थापनासह पाणबुड्यांना पाचरण केल्यानंतर बुडालेल्या वाहनाला के्रनचा गळ लावण्यात यश आले. मात्र सदरच्या वाहनात चालक गोरख खेमनर आढळून न आल्याने त्याचा मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा पाण्याबुड्यांना पाण्यात उतरावे लागले. त्यानंतर तळाशी खाली कपारीत अडकलेल्या खेमनर याचा मृतदेह तब्बल 30 तासानंतर बाहेर काढण्यात आला. त्यानंतरही मयताच्या नातेवाईकांसह डिग्रसच्या काहींनी अपघातास कारणीभूत असलेल्यांसह वाहनाच्या मालकावर व कथीत पाठलाग करणार्‍या पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.


सुरुवातीला या अपघातास पोलिसांचा पाठलाग कारणीभूत असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु असतांना तेथे मंगळापूरातील ग्रामस्थांची ‘एन्ट्री’ झाली आणि अचानक चर्चेचा सूरच बदलला. त्यातून मंगळापूरच्या ग्रामस्थांनी गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबररोजीच सरदचे वाहन पकडून संगमनेरचे तहसीदार धिरज मांजरे यांच्याकडे सोपविले होते. विशेष म्हणजे या वाहनाला नोंदणी क्रमांकासह चेसी क्रमांक नसल्याची बाबही त्याचवेळी समोर आली होती. याचाच अर्थ नियमानुसार बेकायदा ठरलेले सदरचे वाहन त्याचवेळी महसूल विभागाने कायमस्वरुपी जप्त करुन त्याची विल्हेवाट लावण्याची गरज होती. मात्र प्रत्यक्षात तहसीदारांनी थातूरमातूर कारवाई करीत ते सोडून दिले, त्याचा परिपाक अवघ्या महिन्याभरातच ‘त्याच’ वाहनाचा अपघात घडून त्यात दोन छोट्या मुली आणि लहान मुलगा असलेल्या अवघ्या 23 वर्षांच्या गोरख खेमनरचा बळी जाण्यात झाला असा आरोप आता होत आहे.


धक्कायदायक बाब म्हणजे मंगळापूरच्या सरपंच शुभांगी रमेश पवार, उपसरपंच भानुदास म्हातारबा गोरे व कामगार पोलीस पाटील निवृत्ती वाळे यांनी सदर वाहनाबाबत तहसीलदारांकडे लेखी तक्रारही केल्याचे सांगितले जाते. त्या तक्रारीत मंगळापूर येथील मोहन बारकू भोकनळ व शिवाजी राधाकिसन घुले या दोघा वाळू तस्करांच्या नामोल्लेखासह शनिवारी अपघात झालेल्या ‘त्याच’ वाहनातून कशापद्धतीने बेकायदा वाळू वाहतूक केली जाते याचे सीसीटीव्ही फूटेजही देण्यात आले होते. मात्र त्या उपरांतही शासकीय दृष्ट्या बेकायदा असलेले ‘ते’ वाहन नियमित कारवाई करुन सोडून देण्यात आल्याने एकंदरीत महसूलसह शहर पोलिसांच्या भूमिकेबाबतही संशय निर्माण झाला आहे.


सदरच्या पिकअप वाहनाला गेल्या शनिवारी (ता.25) धांदरफळ जवळील काटवनवस्तीसमोर अपघात झाला, त्यात एकाचा बळी गेला. धक्कादायक म्हणजे अपघातापूर्वी 23 नोव्हेंबरपर्यंत हाच टेम्पो बेकायदा वाळू तस्करीच्या कारणावरुन संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र तो अचानक अपघातापूर्वी पोलिसांच्या कस्टडीतून ‘गायब’ झाला आणि थेट विहिरीत कोसळून एकाचा जीव घेवून गेला. हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे. महसूल आणि पोलीस या दोन्ही विभागांचा हलगर्जीपणाच यातून ठळकपणे दिसून येत आहे.


त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अन्यथा फसलेल्या त्यांच्याच धोरणामुळे सोन्याचे भाव प्राप्त झालेल्या वाळूच्या वाहतूकीतून गरीब कुटुंबातील गोरख खेमनरसारख्या ऐन उमेदीतील तरुणांचे बळी जातच राहतील. मंगळापूर व धांदरफळ येथील ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात महसूल विभागासह पोलिसांचाही हलगर्जीपणा ठळकपणे दिसून येतो. हा सगळा प्रकार ‘भ्रष्टाचारा’च्याच श्रेणीतील असल्याने त्याची सखोल चौकशी होण्याची आणि वाळू तस्करीला स्थानिक महसूल व पोलिसांची साथ आहे का? हे स्पष्ट करण्याची गरज आहे.

देवगाव घटनेची पुनरावृत्ती ठरलेल्या धांदरफळ घटनेतील वाहनाबाबत वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंगळापूरच्या सरपंच व पोलीस पाटलांच्या सांगण्यानुसार सदरच्या वाहनाला चेसी क्रमांक व नोंदणी क्रमांकच नव्हता. मग ज्यावेळी सदरचे वाहन तहसीलदारांनी ताब्यात घेतले तेव्हा, आणि जेव्हा गुन्हा दाखल होवून तेच वाहन शहर पोलिसांच्या ताब्यात गेले तेव्हा या गोष्टी का तपासल्या गेल्या नाहीत? याबाबत आता संशय निर्माण झाला आहे. त्यातही कहर म्हणजे शनिवारी अपघातग्रस्त झालेली पिकअप अपघाताच्या दोन दिवस अगोदरच म्हणजे 23 नोव्हेंबरपर्यंत शहर पोलिसांच्या ताब्यात होती अशी अतिशय धक्कादायक माहितीही प्राप्त होत आहे, त्यानंतर अवघ्या 36 तासांतच सदरचा अपघात घडल्याने यासर्व गोष्टींचा खुलासा समोर येण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *