सत्तेच्या गैरवापरातून सुरू असलेली दमदाटी सहन करणार नाही ः वर्पे पालकमंत्री समर्थक सामाजिक कार्यकर्त्याचा चिकणीमध्ये तीव्र निषेध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या विकासात कोणतेही योगदान नसणारे व चिकणी गावात कोणताही संबंध नसताना पालकमंत्री समर्थक व सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गावात येऊन तोडफोड व दमदाटी केली आहे. या पार्श्वभूमीवर चिकणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन दिले आहे. तर सत्तेचा गैरवापर करून अशी दमदाटी सहन करणार नाही असा सज्जड इशारा तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील चिकणी येथे झालेल्या ग्रामसभेत एकमताने याबाबत ठराव करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, भारत वर्पे, चंद्रभान मुटकुळे, राजेंद्र वर्पे, दत्तू वर्पे, संतोष घुले, दत्तात्रय मुटकुळे आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आनंद वर्पे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी आमदार थोरात यांनीच निधी मंजूर केला आहे. ही कामे सुरू असताना पालकमंत्री समर्थक अमोल खताळ हे गावाशी कोणताही संबंध नसताना किंवा पंचायत समिती व इतर विभागाकडे कोणतीही तक्रार नसताना, गावात येऊन कोणत्याही स्थानिक पदाधिकार्याला कोणतीही माहिती न देता कामात हस्तक्षेप व दमदाटी करत आहेत. याचबरोबर त्यांनी स्मशानभूमी कामात तोडफोड केली आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. या गावच्या विकासासाठी चिकणी ग्रामस्थांनी रक्त सांडले आहे. बाहेरून येऊन येथे हस्तक्षेप चालणार नाही. माहिती अधिकाराच्या नावाखाली सुरू असलेली दमदाटी संगमनेर तालुका सहन करणार नसून असे विकासकामे सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रकार केल्यास आगामी काळात जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दूध संघाचे संचालक विलास वर्पे म्हणाले, काही विघ्नसंतोषी मंडळी तालुक्याच्या विकासात खोडा घालू पाहत आहे. या लोकांना नागरिकांनी ओळखले आहेत. ज्यांनी आयुष्यात कधीही सामाजिक काम केले नाही. ते कामे थांबवण्याचे काम करत आहे. यामागे तुम्ही गावात कधी आला नाही. विकासासाठी तुम्ही काही केले नाही. तुमचा संबंध काय असे सांगताना ही दादागिरी थांबली पाहिजे. अन्यथा होणार्या घटनेला प्रशासन व सत्ताधारी भाजप जबाबदार राहील असा इशारा दिला. शेवटी बाहेरच्या व्यक्तीने गावात येऊन केलेली दमदाटी सहन केली जाणार नाही असा ठरावही केला असून, याबाबतचे निवेदन संगमनेर तालुका पोलिसांना दिले आहे.
