देवळाली प्रवरा येथील शिक्षक वसाहतीत दोन ठिकाणी घरफोडी दुचाकीसह दागिने लंपास; चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा-चिंचोली फाटा रस्त्यालगत असणार्या शिक्षक वसाहतीत गुरुवारी (ता.20) पहाटे 3 वाजेच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये एक दुचाकी व सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. मात्र, घरी कोणी नसल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डींग झाले असून, यामध्ये चार चोरटे स्पष्ट दिसत आहेत. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शिक्षक वसाहतीतील सैनिक किरण लोंढे यांच्या घरात पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरी झाली. दिल्ली येथे सैन्यामध्ये कर्तव्य बजावत असल्याने घरी कोणी नव्हते. या गोष्टीचा फायदा घेऊन चार ते पाच चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून काही रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व घराच्या पडवीत लावलेली पल्सर दुचाकी (क्र.एमएच.17, सीएफ.7808) ही चोरुन कपाट व पेटीचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात उचकापाचक केली.
या चोरीनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच असणारे सोमनाथ शहाणे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घराचे कुलूप तोडले. परंतु तेथे त्यांना काहीच सापडले नाही. आणखी बर्याच ठिकाणी घरफोडी करण्याचा त्यांचा डाव होता. परंतु रात्री गस्त घालणारे डॉ.विश्वास पाटील, उंडे, पप्पू सोनावणे, टिक्कल, सुनील गायकवाड यांची चाहूल लागताच चोरट्यांनी पोबारा केला. अन्यथा बर्याच घरफोड्या झाल्या असत्या.
दरम्यान, या घटनेचे शेजारी असलेल्या इमारतीवरील सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रण झाले आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरटे तोंडाला काळे कापड लावलेले व हातात गज घेऊन शेजारच्या बोळीतून येताना व सैनिक लोंढे यांच्या घरात घुसताना दिसत आहेत. याबाबत देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकीला सकाळी कळविले असता मुख्य हवालदार प्रभाकर शिरसाठ, टिक्कल, सचिन फाटके, पारधे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे.