आधुनिक युगातही बैलांवर जीवापाड प्रेम करणारा रणखांबचा बळीराजा! अवघ्या दोन वर्षांपूर्वी कुटुंब सदस्य झालेल्या ‘शिव-शक्ति’चा सोमवारी झाला वाढदिवस सोहळा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतशिवारांमध्ये अहोरात्र राबणार्या, पूर्वापारपासून बळीराजाचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणार्या बैलांची संख्या दिवसोंदिवस कमी होत आहे. आजच्या शेतकर्याने पारंपारिक शेतीत बदल करुन आधुनिकतेची कास धरल्याने शेतीकामांसाठी आता बैलांऐवजी ट्रॅक्टरचा सर्रास वापर होवू लागला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतातून घुमणार्या घुंगरांच्या मंजुळ स्वरांच्या जागी आता ट्रॅक्टरची घरघर कानी येवू लागली आहे. असे असले तरी सधनतेची उंची गाठूनही पारंपारिक शेतीशी घट्ट नाळ जोडलेल्यांचीही संख्या कमी नाही. रणखांब येथील सूर्यभान शेजवळ या पशूप्रिय बळीराजाची कथाही अशीच काहीशी न्यारी आहे. ट्रॅक्टर घेवून सहज शेती करणं शक्य असतांनाही त्यांनी दोन वर्षांपूर्वी बैलजोडी घेतली, आणि सोमवारी चक्क धुमधडाक्यात त्यांचा वाढदिवसही साजरा केला. त्यानिमित्ताने गोडाधोडाच्या पंगती उठल्याने रणखांबच्या सूर्यभान शेजवळ या शेतकर्याची पठारभर चर्चा रंगली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभाग म्हणजे मुळेचा काही भाग वगळता उर्वरीत अवर्षणाशी सतत लढणारा परिसर म्हणून परिचित आहे. उन्हाळ्यात जेथे प्यायलाही पाणी नसते, तेथे जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचा प्रश्न तर अधिकच कठीण. त्यामुळे पठारभागातील शेतकर्यांकडे पशूधनही मोजकेच. मात्र रणखांब येथील सूर्यभान शेजवळ यांचे पशूप्रेम अवघ्या पठाराला माहिती असल्याप्रमाणेच. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एक बैलजोडी विकत घेतली आणि त्यांचे नामकरण ‘शिव आणि शक्ति’ असे केले. शेजवळ कुटुंबात नव्याने दाखल झालेली ही जोडगोळी आल्यादिनीच कुटुंबाचा भाग बनली.
शेजवळ यांना पशूंविषयी प्रचंड जिव्हाळा असल्याने गेल्या दोन वर्ष या बैलजोडीला त्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळले. कालच्या सोमवारी (ता.5) या बैलजोडीचा दुसरा वाढदिवस होता. शेजवळ परिवाराने तो उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवून अगदी आठ दिवसांपूर्वीच त्याची तयारी सुरु केली होती. शिवारातील काही शेतकर्यांना ‘विशेष’ आवतनंही देण्यात आले होते. शेजवळ यांच्या घरावर खास विद्युत रोषनाई करण्यात आली. काल सोमवारी ‘शिव आणि शक्ति’ या दोहींना विशेष सजवण्यात आले होते. सायंकाळी निमंत्रितांच्या साक्षीत त्यांना औंक्षण करण्यात आले, पुरणपोळीचा गोडधोड घासही भरवण्यात आला.
कोरोनाचे संकट आणि त्यात साजरा झालेला हा सोहळा असे सहज कोणालाही वाटेल. मात्र शेजवळ यांनी आपल्या सोहळ्यातून या महामारीचा प्रादुर्भाव होणार नाही याचीही दक्षता घेतली होती. सायंकाळच्या छोटेखानी कार्यक्रमात ‘शिव-शक्ति’च्या नावाने तयार केलेले केक आणले गेले, त्या जोडीच्या साक्षीनेच कापून ते त्यांना खाऊ घालण्यात आले. त्यानंतर निमंत्रितांच्या पंगतीचाही बेत निश्चित होता, त्याप्रमाणे गोडाधोडाचे जेवणही उरकले. आलेल्या मंडळींनी समाधानाचा ढेकर देत या सोहळ्याचे आणि शेजवळ यांच्या पशूप्रेमाचे गोडवेही गायले. आणि म्हणता म्हणता हा सोहळा अवघ्या पठारभागाच्या मुखात जावून पोहोचला.
आजची पिढी शेतीपासून फारकत घेत असतांना, असंख्य शेतकरी पारंपारिक बैला-नांगराची शेती सोडून आधुनिकतेकडे वळालेला असताना, शेजवळ यांनी बैलजोडी घेवून त्यांचे आपल्या मुलांप्रमाणे पालन-पोषण केले. त्यांचा वाढदिवसही साजरा केला आणि त्यांना आपल्या समृद्धीचे वाटेकरीही केले. त्यांचे पशूप्रेम, औदार्य शेतीसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करणार्यांना खरोखरी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे बैलजोडी घेतल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले असताना शेजवळ यांच्या कुुंबातील सगळ्यांनीच त्यांच्या निर्णयाला साथ दिली, त्यामुळे अवघ्या दोनच वर्षात ही बैलजोडी शेजवळ परिवाराच्या गळ्यातील ताईत बनली. आजही शेजवळ यांच्यासारखे शेतकरी असल्याने शेतशिवारात अभावाने का असेना ‘शिव-शक्ति’च्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ स्वर रणखांबकरांना हवासा वाटू लागलाय.
‘अशा गोड आठवणी, त्यांचे करीत रवंथ,
मला मरण येवू दे, तुझे कुशल चिंतीत,
मेल्यावर तुझे ठायी, पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे, तुझ्या पायात वाजू दे..’
कवी श्री.दि.इनामदार यांच्या कवितेतील या ओळी रणखांबच्या सूर्यभान शेजवळ यांच्या बैलजोडीला तंतोतंत लागू व्हाव्यात अशाच आहेत. आजचा शेतकरी पारंपारिक शेतीपासून दूर जात असतांना आणि त्यातून बैलांचे महत्त्व कमी होत असतांना शेजवळ यांनी साजर्या केलेल्या आपल्या लाडक्या बैलांच्या वाढदिवसाने बैलांचे शेतकर्यांच्या जीवनातील महत्त्वच अधोरेखीत केले आहे.