जीवघेणे पदार्थ विकणार्याच्या पोटाची काळजी करायला शाळा नसतात! टपरी चालकांच्या प्रश्नाला हेरंब कुलकर्णी यांनी दिले सणसणीत उत्तर

नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयाजवळील पानटपर्या हटविल्याच्या कारणातून सामाजिक कार्यकर्ते आणि सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. ऑगस्ट महिन्यात कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेच्या पथकाने पानटपर्यांवर कारवाई केली होती. त्यावेळी विरोध करणार्या टपरीचालकांनी आमच्या पोटाचे काय? असा प्रश्न त्यांना केला होता. त्यावर कुलकर्णी यांनी उत्तर दिले की, इतरांचे जीवघेणे पदार्थ विकणार्याच्या पोटाची काळजी करायला शाळा नसते. ५ ऑगस्टला एका फेसबुक पोस्टमध्ये हेरंब कुलकर्णी यांनी या कारवाईबद्दल लिहिले आहे. याच कारणातून त्यांच्यावर हल्ला झाल्याने ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

यामध्ये कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, गुटखा शाळेजवळ विकणे गुन्हा आहे. १०० यार्डात टपरी नसावी असे शासकीय आदेश पाळले जात नाही व शाळाही आग्रह धरत नाहीत. आमच्या सीताराम सारडा विद्यालय शेजारी ४० वर्षे अशी पानटपरी होती. मी तिथे येताच रीतसर अतिक्रमण विरोधी पथकाला पत्र दिले. त्यांनी येऊन ती टपरी काढली. टपरी मालक येताच त्याला शासकीय नियमाचा आदेश दाखवला. आमच्या पोटाचे काय? या प्रश्नावर इतरांचे जीवघेणे पदार्थ विकणार्याच्या पोटाची काळजी करायला शाळा नसते हे उत्तर दिले.

त्यानंतर शाळेजवळील इतर गाड्या, फ्लेक्सही काढले. अनेकजण चारचाकी गाड्या शाळेच्या भिंतीला पूर्णवेळ पार्क करत होते. शाळा काय करील? हा शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन असतो. वाहतूक शाखेकडे पत्र देताच त्यांनी गाड्यांना दंड करताच गाड्या लगेच निघाल्या. व्यसनाला विरोध करण्यासाठी अशा छोट्या – छोट्या गोष्टीही महत्वाच्या आहेत, असेही कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यावेळी कुलकर्णी यांच्या या कारवाईचे स्वागत झाले होते. इतर शाळांकडून आणि प्रशासनाकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जाऊ लागल्या होत्या. दुर्दैवाने त्यापूर्वीच कुलकर्णी यांच्यावरच हल्ला झाला. त्यामुळे आता कुलकर्णी काय भूमिका घेणार आणि या कारवाईचे पुढे काय होणार याची उत्सुकता होती. यावरही कुलकर्णी यांनी आता उत्तर दिले आहे. जखमा बर्या झाल्याने उद्यापासून शाळेत जाणार असून आपण सुरू केलेला हा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी हेरंब कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण देऊ केले होते. एक दिवस त्यांच्या घराजवळ पोलीस दिसले. मात्र, नंतर पुन्हा संरक्षण काढून घेण्यात आल्याचे दिसून आले. यावर निर्भय बनो चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत पोलीस अधीक्षकांकडे कुलकर्णी यांना बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे. स्वत: कुलकर्णी यांनी मात्र त्याची अवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
