आजपासून संगमनेर फेस्टिव्हलचा जल्लोष! पाच दिवस मनोरंजक कार्यक्रम; शिवरायांच्या शौर्यगाथेने शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेशोत्सवातील सर्वात मोठे आकर्षण असलेल्या संगमनेर फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात होत आहे. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर व्यवसायाने संगणक अभियंता म्हणून बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या दोघा तरुणांच्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण स्वारीतील रंजक गोष्टींचा समावेश असलेल्या शौर्यगाथेने संगमनेरचा मानबिंदू ठरलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. आजपासून सुरु होत असलेल्या या महोत्सवाला संगमनेरकरांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी केले आहे.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारा गेल्या १५ वर्षांपासून संगमनेरात दरवर्षी गणेशोत्सवात संगमनेर फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. दरवर्षी सादर होणार्या वीरगाथा, शौर्यगाथा, गायन, नृत्य, नाट्यप्रयोग, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, कवी संमेलन, लोककला अशा बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी संगमनेरचा सांस्कृतिक वारसा अधिक प्रगल्भ बनला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील आजपासून पुढील पाच दिवस अशाच वेगवेगळ्या मनोरंजक कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार आहे.

आज (ता.२०) सायंकाळी ६ वाजता संगमनेर फेस्टिव्हलचा दिमाखदार पद्धतीने उद्घाटन सोहळा होणार असून त्यासाठी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मालपाणीउद्योगसमूहाच्यासुरक्षा विभागाकडून पारंपरिक पद्धतीनेगणरायांना मानवंदना दिल्यानंतर फेस्टिव्हल ज्योत प्रज्ज्वलित करुन या सोहळ्याला सुरुवात होईल.

आजच्या शुभारंभाच्या दिनी संगमनेरकरांना शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयातील वेगवेगळ्या पराक्रमी आणि रोमांचित गोष्टी श्रवण्याची संधी मिळणार आहे. सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या तरुण संगणक अभियंत्यांनी मराठ्यांच्या पराक्रमाचे किस्से एकत्रित करुन त्यावर आधारित ‘गोष्ट इथे संपत नाही’ या अनोख्या कार्यक्रमाची रचना केली आहे. शिवकाल आणि त्यानंतरच्या पेशवाईतील निवडक आणि रंजक कथांचा समावेश असलेला हा कार्यक्रम मनामनात राष्ट्रज्योत प्रज्ज्वलित करणारा ठरला आहे. या कार्यक्रमातून शिवरायांच्या दक्षिण स्वारीतून मराठ्यांनी साधलेला दीर्घकालीन परिणाम प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळणार आहे.

फेस्टिव्हलच्या दुसर्या दिवशी गुरुवारी (ता.२१) सायंकाळी ७ वाजता हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहारगीतांची मैफील ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड लाईव्ह’ या कार्यक्रमातून रंगणार आहे. शुक्रवारी (ता.२२) कलाकारांच्या कलागुणांना रंगमंच उपलब्ध करुन देणारा ‘डान्सिंग सुपरस्टार’ हा राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेचा कार्यक्रम होणार आहे. दोन गटांत होणार्या या स्पर्धेसाठी एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शनिवारी (ता.२३) धम्माल मराठी अभिनेता भरत जाधव याच्या वेगवेगळ्या चौदा भूमिकांचा नवा कोरा कल्ला असलेल्या ‘तू तू मी मी‘ तर फेस्टिव्हल समारोपाला लिव्ह-इन-रिलेशन संस्कृतीवर आधारित प्रसिद्ध सिनेअभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या वास्तववादी कौटुंबिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून रविवार २४ सप्टेंबरपर्यंत मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संगमनेर येथे होणार्या संगमनेर फेस्टिव्हलच्या सर्व कार्यक्रमांना संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांच्यासह राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओंकार इंदाणी, कोषाध्यक्ष व्यंकटेश लाहोटी आदिंसह मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
