विभागीय गस्तीत सराईत ‘घरफोड्या’ अडकला! राजूर पोलिसांची कामगिरी; मुद्देमालही झाला हस्तगत..


नायक वृत्तसेवा, अकोले
संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दित रात्रीची गस्त घालून राजूरकडे माघारी निघालेल्या पोलिसांनी संशयावरुन पकडलेला आरोपी चक्क सराईत घरफोड्या असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडील अधिकच्या चौकशीत अवघ्या 24 तासांपूर्वी त्याने राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दितील माणिकडोह येथील एका वृद्धेच्या घरात डल्ला मारुन 53 हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात त्याच्या साथीदाराचे नावही समोर आले आहे. वृद्धेच्या घरातून चोरलेला संपूर्ण ऐवज पुन्हा मिळवण्यातही पोलिसांना यश आले आहे.


याबाबत राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस दलातील कार्यपद्धतीनुसार मंगळवारी रात्री राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे सहकारी पोलीस शिपाई अशोक गाढे यांच्यासह विभागीय बंदोबस्तासाठी संगमनेर पोलिसांच्या हद्दित आले होते. येथील गस्तीचे काम आटोपून पहाटे दीच्या सुमारास ते पुन्हा राजूरकडे जात असतांना कोल्हार-घोटी राज्य मार्गावर एकजण संशयितपणे वावरत असल्याचे पाहुन त्यांनी त्याला पकडले.


यावेळी त्याच्या चौकशीतून तो अकोले तालुक्यातील गर्दणीत राहणारा अनिल भिमा मडके असल्याचे समोर आले. इतक्या अपरात्री गर्दणीसोडून इथे येण्याचे कारण विचारल्यानंतर मात्र त्याची भंबेरी उडाली आणि तो उडावाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यात त्याच्या कमरेला घश्रफोड्या करण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी पक्कड आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळीत त्याला पोलीस ठाण्यात आणले.


अपरात्री गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरतांना आढळल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले. मात्र त्याचे एकंदरीत बोलणे, वागणे आणि वावरणे सुरुवातीपासूनच संशयात्मक वाटत असल्याने हा आरोपी सराईत असावा असा सहाय्यक निरीक्षक दातरे यांचा कयास होता. त्यामुळे त्यांनी सखोल चौकशी करीत त्याने गुन्हे केले आहेत का? याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. त्यातूनच अवघ्या 24 तासांपूर्वी सोमवारी (ता.11) रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दितच गुन्हा केल्याचे समोर आले.


या घटनेत माणिकडोह येथील जानकाबाई जिजाबा जंगले ही 80 वर्षीय वृद्ध महिला रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या पतीसह घराला कडी लावून जवळच राहणार्‍या आपल्या मुलाच्या घरी गेले होते. या संधीचा फायदा घेत आरोपी अनिल भिमा मडके याने त्यांच्या घरात प्रवेश करुन रोकड, सोन्या-चांदीचे दागिने व लोखंडी पेटी असा 53 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले. मात्र या प्रकरणात त्यांची फिर्याद दाखल नसल्याने पोलिसांनी त्यांना बोलावून तक्रार नोंदवून घेतली.


चोरीच्या या प्रकरणात सहआरोपी असलेला भागाजी यशवंत जंगले (वय 32, रा.माणिकडोह) याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरावरही छापा घातला. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने तो आधीच जंगलाच पसार झाला. अटक करण्यात आलेल्या अनिल मडके याच्याकडून 53 हजारांचा संपूर्ण ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत राजूरचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस हेड काँस्टेबल कैलास नेहे, बारकू गोंधे, महिला पोलीस नाईक रोहिणी फाटांगरे, पोलीस शिपाई विजय फाटांगरे, अशोक गाढे, अशोक काळे, महिला पोलीस शिपाई उषा मुठे व चालक राकेश मुळणे आदींचा सहभाग होता.

Visits: 7 Today: 1 Total: 79454

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *