महावितरणच्या कारभाराविरोधात गणेश मंडळांचा रोष संगमनेरात शांतता समितीची बैठक; पोलीस अधीक्षकांनी केले मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महावितरण कंपनीकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना योग्य पद्धतीने सहकार्य केले जात नाही. उत्सव काळातच अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. तो सुरळीत करण्यासाठी संबंधितांशी वारंवार संपर्क करूनही तो होत नाही. त्यामुळे महावितरण कंपनी विरोधात संगमनेरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शांतता समितीच्या बैठकीत रोष व्यक्त केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भावनातील सभागृहात सोमवारी (ता.28) शांतता समितीची बैठक पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांसह विविध विभागाचे अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात महावितरण कंपनीकडून योग्य खबरदारी घेतली जात नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपाचा वीज पुरवठा करण्यासाठी योग्य मार्गदर्शन होत नाही. विजेचे मीटर देखील मिळत नाहीत. काही ठिकाणी हाताला लागतील एवढ्या खालपर्यंत वीज पुरवठा करणार्‍या तारा आल्या आहेत. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. उत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणे ही बाब नित्याची झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घालून महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना सूचना द्याव्यात अशीही मागणी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.


उत्सव साजरा करत असताना ज्या गोष्टी समाजाला नको आहेत, त्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न पोलीस करतात. स्वयंस्फूर्तीने सर्वांनी नियम पाळावेत. संगमनेर शहर सुधारणावादी आहे. त्यामुळेच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल उधळला जात नाही. आवाजाची मर्यादा असावी. बालके ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना त्रास होणार नाही. याचा विचार सर्वांनी करावा. समाज माध्यमातून हेतू परस्पर चुकीचे कृत्य होते. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
मनोज पाटील (जिल्हा पोलीस अधीक्षक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *