‘दुर्गवैभव’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन! साहित्यिक विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या महाराष्ट्रातील प्रमुख गडकोटांची सचित्र माहिती असलेल्या ‘दुर्गवैभव महाराष्ट्राचे’ या श्रीकांत कासट लिखित पुस्तकाचे रविवारी प्रकाश होत आहे. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासह शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, केंद्रीय आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव डॉ. ओमप्रकाश शेटे, उद्योजक मनीष मालपाणी व राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पाटील यांच्या मुखातून मराठ्यांचा वैभवशाली इतिहास ऐकण्याची संधीही मिळणार आहे.

गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळापासून गडभ्रमंती करणार्या श्रीकांत कासट यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणार्या गडकोटांबाबत जनमानसात आवड निर्माण व्हावी यासाठी सातत्यपूर्ण काम केले आहे. गीता परिवाराच्या माध्यतातून अनेक वर्ष त्यांनी गिरीभ्रमण शिबिरांचे आयोजन करुन आजवर हजारो मुलांना किल्ल्यांचा लळा लावला. गडसंवर्धनाच्या मोहिमेतही त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून त्याची दखल घेत राज्य शासनाने गडकोट संवर्धनाच्या उद्देशाने स्थापन केलेल्या समितीमध्येही त्यांचा समावेश आहे.

सह्याद्रीचा प्रत्येक सुळका आणि कडा परिचित झालेल्या कासट यांनी अगदी जुन्या जमान्यातील कॅमेर्यापासून ते आधुनिक युगातील मिरर इमेज कॅमेर्यापर्यंतच्या आयुधांचा वापर करुन महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच किल्ल्यांची वेगवेगळ्या ऋतूंमध्ये काढलेली छायाचित्रे अफलातून आहेत. या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविले जाते आणि त्याला हजारोंचा प्रतिसादही मिळतो. त्यांच्या अफाट भटकंतीची आणि दुर्ग अभ्यासाची दखल घेत इतिहास संशोधनात मोठे काम करणार्या धुळ्याच्या वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाने त्यांच्या दुर्गभक्तीला पुस्तकाची जोड दिली. राज्यातील काही महत्त्वाच्या आणि निवडक गडकोटांची छायाचित्रे आणि आवश्यक माहिती असलेल्या ‘दुर्गवैभव महाराष्ट्राचे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता.२०) सायंकाळी ४ वाजता मालपाणी लॉन्स कॉलेज रोड येथे होणार आहे. हा कार्यक्रम गीता परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आला असून दुर्गप्रेमींनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन गीता परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
