बघायला आला एकीला आणि पळवून नेलं भलतीला! पठारभागातील धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलगी गरोदर, आरोपी गजाआड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागातील मुलीला बघायला आलेल्या उतावळ्या नवरदेवाने ज्या मुलीला बघितलं तिला सोडून भलत्याच मुलीवर गळ टाकला. अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि घरात कोणी नसल्याची संधी साधून गेल्या आठ महिन्यांपासून तिच्याशी शारीरिक संबंधही निर्माण केले. दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या अंधारात तिला पठारभागातून पळवून नेले आणि त्यानंतर तब्बल महिनाभर आपल्या घरातच तिच्यावर अत्याचार केला. त्यातून अवघ्या सोळा वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार पठारभागातील बोटा परिसरातून समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन घारगाव पोलिसांनी अपहरण, अत्याचार व पोक्सोतील तरतुदींनुसार जुन्नर तालुक्यातील प्रवीण सावळेराम जाधव या एकोणावीस वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सुमारे आठ महिन्यांपासून ते गेल्या महिन्यातील ४ तारखेपर्यंत नियमितपणे सुरु होता. यातील १६ वर्ष दोन महिने वयाच्या पीडितेच्या चुलत मामे बहिणीला बघण्यासाठी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथील प्रवीण सावळेराम जाधव (वय १९ वर्ष २ महिने) आला होता. यावेळी बघायला आलेल्या मुलाशी बोलता यावे यासाठी उपवर मुलीने पीडितेचा मोबाईल क्रमांक त्याला दिला होता. मात्र बघण्याच्या कर्यक्रमानंतर त्या दोघांचे काही जमले नाही. त्यामुळे आरोपीने मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर सातत्याने फोन करुन पीडित अल्पवयीन मुलीलाच गळाला लावले. त्यातून संवाद सुरु झाल्यानंतर तो आपल्या गावाहून थेट बोटा शिवारात येवून पीडितेला भेटूही लागला.
सुमारे आठ महिन्यांपूर्वी तो असाच पीडितेला भेटण्यासाठी आला असता तिच्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून लग्नाचे आमिष दाखवित त्याने बळजोरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून मनोबल वाढल्याने तो वारंवार बोटा शिवारात येवू लागला आणि पीडितेच्या घरी कोणी नसताना आपली शारीरिक भूक भागवू लागला. अशा प्रकारानंतर प्रत्येकवेळी घडला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी त्याने पीडितेला धमकी देण्याचाही प्रकार केला. दोन महिन्यांपूर्वी ९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तो असाच तिला भेटण्यासाठी बोटा शिवारात आला.
यावेळी त्याने पीडितेला फोन करुन घराजवळ भेटण्यासाठी बोलावले. पीडित मुलगी तेथे जाताच त्याने वेगवेगळी आमिषं दाखवून तिला आपल्या दुचाकीवर बसवून ब्राह्मणवाडामार्गे आपल्या घरी आंबेगव्हाण येथे नेले. तेथेही त्याने तिच्यावर नियमित अत्याचार केले. आपली मुलगी आंबेगव्हाण येथे असल्याचे समजल्यानंतर पीडितेचे आई-वडील तिला घेण्यासाठी तेथे गेले असता आरोपी प्रवीण जाधव याने ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे, मी तिच्याशी लग्न करणार आहे’ असे सांगत त्यांना पिटाळून लावण्याचाही प्रयत्न केला, मात्र पीडितेने त्याला नकार देत ती आपल्या वडीलांसोबत घरी परतली.
या दरम्यान ती गर्भवती राहिल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर अखेर १० ऑगस्ट रोजी तिने गेल्या आठ महिन्यांपासून घडलेला सगळा घटनाक्रम आपल्या जन्मदात्यांना सांगितला. तो सगळा प्रकार ऐकून हादरलेल्या त्या अडाणी माता-पित्यांचे तर आभाळच फाटले. मात्र झाला प्रकार पुन्हा उद्भवू नये यासाठी त्यांनी तक्रार देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पीडितेने आपल्या जन्मदात्यांसह घारगाव पोलीस ठाण्यात येवून तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी प्रवीण सावळेराम जाधव (वय १९ वर्ष, २ महिने, रा. आंबेगव्हाण, ता.जुन्नर) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (जे) (एन), ५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम ४, ६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत आरोपीला गजाआड केले आहे. या प्रकाराने तालुक्याचा पठारभाग पुन्हा एकदा चर्चेत आला असून पालकांची चिंताही वाढली आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल आल्यानंतर त्यातून समोर येणार्या सकारात्मक घटनांपेक्षा अशाप्रकारच्या दुर्दैवी घटनाच अधिक प्रमाणात समोर आल्या आहेत. या घटनेतही वेगळ्याच मुलीला बघायला आलेल्या उतावळ्या दादल्याने केवळ संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरुन अल्पवयीन मुलीला गळाला लावून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर पोटातील गर्भ आपलाच असल्याचे सिद्ध करण्यासाठी पीडितेकडून पुरावेही मागितले आणि अखेर थेट गजाआड पोहोचला. या घटनेतून आजही आपल्या अल्पवयीन पाल्यांवर अंधविश्वास ठेवणार्या पालकांनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.