जागामालकाच्या पुतण्यानेच लावली ‘त्या’ गोदामाला आग कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आगीत मोठे नुकसान


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना सोमवारी (ता.२६) रात्री घडली. याप्रकरणी स्टेशनरी दुकानदाराने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विशाल विजय नानकर यांचे कोहिनूर बुक स्टॉल नावाचे दुकान आहे. दुकानासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी कहार गल्ली येथे विक्रम मधुकर मेहरे (रा.कोकमठाण) यांच्या चुलत्याचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे गोदाम रिकामे करून देण्यासाठी मेहरे हे नानकरकडे तगादा लावत होते. परंतु नानकर यांनी गोदाम रिकामा करून देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्याचा राग येऊन विक्रम मेहरे यांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गोदामाला चक्क आग लावून दिली. याआगीत शालेय साहित्य वह्या, पुस्तके, छत्र्या, नोटीस बोर्ड व इतर स्टेशनरी जळून खाक झाली होती.

आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या बंबाला दोन तासांचा अवधी लागला होता. घटनेनंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. एक दिवसानंतर नानकर यांनी कोपरगाव शहर पोलीस गाठून वरील आशयाची तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित विक्रम मधुकर मेहरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.

Visits: 123 Today: 1 Total: 1801041

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *