अखेर ‘त्या’ कॅफे हाऊसचे चालक-मालक ‘पोक्सोत’ सहआरोपी! पोलीस उपअधीक्षकांचा क्रांतिकारी निर्णय; अकोले बायपास रस्त्यावरील एंजल कॅफे हाऊस..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात ‘कॅफे हाऊस’च्या गोंडस नावाखाली विद्यार्थीनींना वाममार्गाला लावणार्या कॅफे हाऊस विरोधात संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. शनिवारी पठारभागातील एका साडेचौदा वर्ष वयाच्या मुलीवर संगमनेरातील एका कॅफे हाऊसमध्ये अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आता धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अत्याचाराच्या या प्रकरणात शेडींवाडीतील नराधमाला अटक केल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदाच अत्याचारासाठी सहाय्य केल्याचा ठपका ठेवून अकोले नाक्यावरील कुप्रसिद्ध ‘एंजल कॅफे’ हाऊसच्या मालकासह त्याच्या तिघा चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला असून त्या चौघांनाही अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्यान्वये (पोक्सो) सहआरोपी करण्यात आले असून त्यातील तिघांना अटकही करण्यात आली आहे. या कारवाईने पालकवर्गातून पोलिसांचे कौतुक होत असून अशाप्रकारचे शहरातील सर्व अश्लिल केंद्र उध्वस्त करण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षात संगमनेर शहरातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात ‘कॅफे सेंटर’ अशा नावाने अश्लिल चाळ्यांची अशी असंख्य केंद्र सुरु झाली आहेत. अशा ठिकाणी यापूर्वी पोलिसांकडून प्रासंगिक किरकोळ कारवाया झाल्याने मनोबल वाढलेल्या कॅफे चालकांनी पैशांच्या लालसेसाठी विद्यार्थ्यांचा बाजार मांडतांना आपल्या कॅफे हाऊसमध्ये स्वतंत्र कप्पे (कम्पार्टमेंट) व खोल्याही निर्माण केल्या आहेत. अशा ठिकाणी एखादे जोडपे आल्यास त्यांच्याकडून तासानुसार पैसे वसुल केले जातात व त्या बदल्यात संबंधित जोडप्याला एकांतही उपलब्ध करुन दिला जातो. त्याचा परिणाम अनेक पिसाट अल्पवयीन मुलींसह विद्यार्थीनींना कॉफीचे आमिष दाखवून अशा ठिकाणी घेवून येतात व मिळालेल्या एकातांत त्यांच्याशी अश्लिल कृत्य करतात.
यापूर्वी असे प्रकार वेळोवेळी समोर आलेले आहेत, मात्र पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई होत असल्याने अशा प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत राहीली. मध्यंतरी अशाच एका प्रकरणात घुलेवाडीतील ‘ते’ कॉफी सेंटरही चर्चेत आले होते. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्याच्या चालकावर विशेष कारवाई केली नाही. त्यामुळे अशा अश्लिल ठिकाणंामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत असतांनाच अकोले बायपास रस्त्यावरील एंजल कॅफे सेंटर येथे शनिवारी (ता.22) एका अवघ्या साडेचौदा वर्ष वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी रविवारी पहाटे घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी गणेश सुखदेव भडांगे (वय 21, रा.शेंडेवाडी) याला अटक केली.
त्यातूनच संगमनेरातील कॅफे सेंटर पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना आता संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे ऍक्शन मोडमध्ये आले असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी अकोले रस्त्यावरील एंजल कॅफे हाऊसचा मालक मिलिंद भारत ताजणे (वय 34, रा.विठ्ठलनगर, अकोले बायपास), चालक स्वयंम हेमंत पंधारे (वय 23, रा.मालदाड रोड), प्रवीण काशिनाथ कोठवळ (वय 27, रा.महालवाडी) व अक्षय जाधव (पसार) अशा चौघांवर अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यात 34 प्रमाणे सहआरोपी करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पोलिसांनी आरोपींची संख्या एकवरुन पाच करीत एंजल कॅफे सेंटरच्या मालक व पहिल्या दोघा चालकांनाही बेड्या ठोकल्या असून तिसर्याचा शोध सुरु आहे. अटक केलेल्या तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शहरात अशाप्रकारे अश्लिल चाळ्यांचे केंद्र उभारुन त्यातून बक्कळ पैसा कमावण्याचे स्वप्न पाहणार्यांचे धाबे दणाणले असून काहींनी पर्यायी व्यवसाय शोधण्यास सुरुवात केली आहे.
संगमनेरातील अनेक मोठ्या शाळा व महाविद्यालयांसह शहरालगतच्या रस्त्यांवर अशा प्रकारचे अनेक कॉफी सेंटर सुरु झाले असून केवळ चहा, कॉफी आणि स्नॅक्स मिळण्याची ठिकाणे असतांनाही अंतर्गत भागात मात्र बिअरबारप्रमाणे स्वतंत्र कम्पार्टमेंट (आडोसे) निर्माण करण्यात आले आहे. अशा ठिकाणी केवळ विद्यार्थीनी आणि त्यांच्यासोबत मुले असल्याचेही प्रत्येकवेळी आढळून येते. मात्र आता पोलिसांनी पहिल्यांदाच क्रांतिकारी निर्णय घेत अशाप्रकारच्या गुन्ह्यात जागा मालकालाही सहआरोपी करण्यास सुरुवात केल्याने संगमनेरातील केवळ कॅफे हाऊसच नव्हेतर तासाला हजार ते दोन हजार रुपये आकारुन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध करुन देणार्या लॉज चालकांचेही धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून अशाप्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याचीही मागणी होत आहे.
एखादा गुन्हा घडवण्यास सहाय्यभूत ठरेल अशी कृती कोणाकडून घडणार असेल तर त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावाच लागेल. गेल्याकाही दिवसांत संगमनेरातील काही कॅफे हाऊस व लॉजमध्ये अशाप्रकारचे गैरकृत्य सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा सुरु असतांना शनिवारी एंजल कॅफे हाऊसमधील अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. कायदेशीरदृष्ट्या अशा गुन्ह्यात सहाय्य करणाराही दोषी असल्याने यापुढे उपविभागातील कोणतेही कॅफे हाऊस अथवा लॉजमध्ये असे प्रकार घडल्यास संबंधितांना त्या प्रकरणात सहआरोपी केले जाणार आहे. व्यावसायिकांनी नितीमूल्य ठेवून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे.
सोमनाथ वाघचौरे
पोलीस उपअधीक्षक, संगमनेर उपविभाग