‘पोत’ घेवून पळाले मात्र जमावाने पकडून धोऽधो बदडलेे! संगमनेरच्या माळीवाड्यातील घटना; दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेल्या श्रीरामपूरातील चोरट्यांनी संगमनेरात येवून मंगळवारी दुकानात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पोबारा केला. मात्र त्यावेळी झालेल्या आरडाओरडने पुढच्या चौकातील तरुण सावध झाल्याने त्यांनी सापळा लावून दोघांना पकडले. यावेळी त्यांचा कारनामा समोर येताच जमलेल्या जमावाने त्या दोघांनाही धोऽधो बदडले आणि क्षणात हजर झालेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच नाशिक रस्त्यावरुनही आणखी एक प्रकार समोर आला. पकडलेल्या दोघांचा या घटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. पकडलेल्या चोरट्यांकडून वेगवेगळे क्रमांक असलेल्या दुचाकीच्या काही पाट्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.4) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास माळीवाड्यातील गायत्री मेडिकल या दुकानात घडली. या दुकानाचे चालक सुभाष अभंग पत्नीला दुकानात थांबवून कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत पल्सर मोटारसायकलवर आलेले दोघे त्यांच्या दुकानासमोर येवून थांबले. यावेळी पाठीमागे बसलेल्या इसमाने खाली उतरुन दुकानात जात डोक्यावरची गोळी घेण्याचा बहाणा केला आणि संधी साधून श्रीमती अभंग यांच्या गळ्यातील एकतोळा वजनाची सोन्याची पोत ओरबाडली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने घाबरलेल्या अभंग यांनी तशाही स्थितीत जोरजोरात आरडाओरड केली. हा सगळा प्रकार सुरु असताना या औषध दुकानापासून सुमारे शंभर मीटर अंतरावरील नेहरु उद्यानाजवळ काही तरुण गप्पा मारत होते. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांनी त्या दिशेने पाहिले असता अगदी समोरच दिसणार्‍या औषध दुकानात घुसून दोघांनी काहीतरी केल्याचे आणि त्यानंतर दुचाकीवरुन ते दोघेही आपल्याच दिशेने येत असल्याचे या तरुणांनी पाहिले आणि क्षणात त्यांनी एकमेकांना साद घालीत ‘त्या’ औषध दुकानापासून नेहरु उद्यान, पोलीस ठाण्याच्या दिशेने सुसाट वेगाने येणारी चोरट्यांची दुचाकी अडवली. तोपर्यंत सदरील महिलाही धावतच तेथे पोहोचली आणि त्यांनी घडला प्रकार तेथे जमलेल्या तरुणांसह जमावाला सांगितला.

पकडलेले दोघेही सोनसाखळी चोर असल्याचे समजताच जमावाचा पारा चढला आणि जमलेल्या प्रत्येकानेच आपल्या हाता-पायाची खाज भागवून घेत त्या दोघांनाही धोऽधो बदडले. तोपर्यंत सदरची वार्ता हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनाही समजली, त्यांनीही तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत जमावाच्या तावडीतून दोन्ही चोरट्यांची सुटका करुन त्यांना पोलीस ठाण्यात नेले. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या बजाज-पल्सर (क्र.एम.एच.16/ए.सी.2685) दुचाकीच्या डिकीत वेगवेगळे क्रमांक असलेल्या दुचाकीच्या पाट्याही (नंबर प्लेट) पोलिसांना आढळून आल्या. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या दुचाकीचा क्रमांक खरा की खोटा याचा तपास होणं अद्याप बाकी आहे.

याप्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु असतानाच अर्ध्या तासापूर्वी घडलेला आणखी एक प्रकार समोर आला. या घटनेत गणेशनगर परिसरात राहणार्‍या एका दाम्पत्याने नाशिक महामार्गावर शतपावली करीत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची कैफीयत मांडली. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही चोरट्यांची ओळख परेडही घडवली, मात्र त्यांना ओळखण्यात त्या जोडप्याने असमर्थता दाखवली. चोरट्यांच्या अंगझडतीतूनही संबंधित जोडप्याकडून लांबविलेला मुद्देमाल आढळून आला नाही. मात्र त्यातून या चोरट्यांसोबत आणखी एखादा असण्याचीही शक्यता समोर आली आहे. तूर्त पोलिसांनी संबंधित जोडप्याची तक्रार दाखल करुन घेतलेली नाही, मात्र या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

माळीवाड्यातील औषध दुकानात घडलेल्या प्रकाराबाबत सुभाष जनार्दन अभंग (रा.अंभग मळा) यांची फिर्याद दाखल करुन घेण्यात आली असून त्यावरुन दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32, रा.वा हीींिं://रा.वा/ॅर्ड नं.3, सावता रोड) व लखन विजय माळवे (वय 32, रा.वा हीींिं://रा.वा/ॅर्ड नं.7, लबडे वस्ती, दोघेही श्रीरामपूर) या दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. आज दुपारनंतर त्यांना न्यायालयासमोर उभे करुन त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकारातून संगमनेरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केल्यास सोनसाखळी चोरांची टोळी उघड होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात घडणार्‍या विविध गुन्हेगारी घटनांचे केंद्र नेहमीच श्रीरामपूर असल्याचे अनेकदा ठळकपणे समोर आले आहे. संगमनेरात घडणार्‍या सोनसाखळी चोरीच्या घटना, बसस्थानकातील चोरीचे प्रकार, बँकांमधून रोकड घेवून जाणार्‍यांना लुटण्याच्या घटना यासह बाजारात फिरुन फसवणूक करणार्‍या महिलाही श्रीरामपूरातून संगमनेरात येवून आपला कार्यभाग उरकीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेल्या श्रीरामपूरकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष देवून तेथील गुन्हेगारांचे निर्दालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडतही राहतील आणि त्यांची शासकीय दप्तरी केवळ नोंदही होत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *