दोनवेळच्या पराभूतासाठी विक्रमी मताधिक्य घेणार्याची माघार जिव्हारी! संगमनेर मर्चन्ट्स बँक; ‘बिनविरोध’साठी नाकारलेल्यांचा ‘हट्ट’ जनादेशाचाच अवमान..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर-अकोल्याच्या व्यापाराला आर्थिक स्थैर्य मिळवून देणार्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेची यंदाची निवडणूक ‘बिनविरोध’ झाली. आर्थिक संस्थांमध्ये राजकारण नसावे हा हेतू ठेवून संस्थापकांनी ही संस्था उभी केली. परंतु, गेल्या 58 वर्षांमध्ये कधीही बिनविरोधचा प्रसंग अनुभवायला आला नाही. यावेळी मात्र व्यापारी एकता पॅनेलच्या प्रमुखांनी ‘इतिहास’ घडवण्यासाठी शर्थ केली, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दिग्गजांनी आपल्या उमेदवार्या मागे घेतल्या. परंतु, सर्वसाधारण गटातील एका जागेवर दोनवेळा बँकेच्या सभासदांनी नाकारलेला उमेदवार मात्र शेवटपर्यंत हट्टाने उभा राहिला. अनेकांनी त्याची मनधरणीही केली, विनवण्याही झाल्या. परंतु त्याच्यावर त्याचा कोणताही परिणाम न झाल्याने ‘अखेर’ बँकेतील सेवाधारी मंडळाच्या प्रमुखांनीच आपल्या माघारीचा प्रस्ताव ठेवल्याने तो नाकारुन मंडळातील ज्येष्ठ संचालक श्रीगोपाळ पडताणी यांनी आपल्याच माघारीचा अर्ज दाखल करुन ही निवडणूक ऐतिहासिक ठरवली. संस्थेचा खर्च, मनुष्यबळ टाळून परस्परातील कटूता संपवण्यासाठी झालेल्या ‘बिनविरोध’च्या प्रयत्नात मात्र दोनवेळा पराभूतासाठी विक्रमी मते घेवून विजयी झालेल्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली. हा प्रकार सभासदांच्या जिव्हारी लागला असून ‘बिनविरोध’साठी नाकारलेल्यांचा ‘हट्ट’ जनादेशाचा अवमान असल्याच्या तिखट चर्चा आता समाज माध्यमातून चर्चिल्या जात आहेत.
अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी (ता.2) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी संगमनेरची कामधेनू असलेल्या मर्चन्ट्स बँकेची निवडणूक बिनविरोध ठरली. त्यासाठी सर्वसाधारण महिला गटातील दोन, इतर मागास प्रवर्गातील तीन आणि भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्गातील पाच जणांनी अगदी शेवटच्या क्षणी आपले अर्ज माघारी घेत संस्थाचालकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बँकेचे हित साधले. मात्र त्याचवेळी सर्वसाधारण गटातील बारा जागांसाठी 15 अर्ज शिल्लक असताना त्यातील दोघांनी स्वयंस्फूर्तीने माघार घेतल्यानंतर एका अतिरिक्त उमेदवारचा अर्ज कायम राहिला. शहरातील आणि समाजातील अन्य संस्थांमध्ये त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य विद्यमान असतानाही आणि व्यापारी एकता पॅनेलच्या ज्येष्ठ संचालकांसह पॅनेल प्रमुखांनी प्रत्येक संस्थेत पदासाठी आघाडीवर असलेल्या ‘त्या’ उमेदवाराच्या घरी जावून त्याची मनधरणी केली, विनवण्याही केल्या. मात्र त्याने आपला हेका कायम ठेवताना माघारीच्या वेळेपर्यंत ‘स्वीच ऑफ’ केल्याने संस्थेच्या एका ज्येष्ठ, अभ्यासू आणि मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार्या उमेदवाराला आपला बळी द्यावा लागला.
विशेष म्हणजे संस्थेच्या हितासाठी यावेळची निवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता ज्या उमेदवारासाठी श्रीगोपाळ पडताणी यांना माघार घ्यावी लागली त्या उमेदवाराला तब्बल दोनवेळा मर्चन्ट्सच्या सभासदांनी साफ नाकारले आहे. यापूर्वी 2006 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण 23 उमेदवारांमध्ये या महाशयांना 3 हजार 527 मतांमध्ये शेवटच्या क्रमांकाची अवघी 393 मते, तर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत 3 हजार 588 मतांमध्ये शेवटून दुसर्या क्रमांकाची 1 हजार 102 मते मिळाली होती. त्याचवेळी या उमेदवारासाठी यंदा माघार घेणार्या पडताणी यांना मात्र सभासदांनी भरभरुन मतदान करताना 2 हजार 323 मतांनी विजयी केले होते. संस्थेच्या हितासाठी व्यापारी एकता मंडळाच्या प्रमुखांनी व अन्य संचालकांनी या ‘हट्टी’ उमेदवाराला माघारीचे वारंवार आवाहनही केले. वास्तविक संबंधित इच्छुकाला काम करण्याच्या विविध संधी, व्यापारी असोसिएशन, तालुका माहेश्वरी सभा या संस्थांच्या विद्यमान पदातूनही चांगले काम करण्याची संधी आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य शारदा पतसंस्थेत याच पॅनेलचे सदस्य म्हणूनही काम करीत आहे. असे असतानाही सदरच्या उमेदवाराने शेवटपर्यंत आपला ‘हट्ट’ मात्र सोडला नाही.
एका व्यक्तीच्या हट्टाने 58 वर्षांच्या बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा निर्माण झालेली इतिहास घडवण्याची संधी गमावण्याची इच्छा नसल्याने अखेर माघारीच्या काही मिनिटे अगोेदर व्यापारी मंडळाचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी आपण 20 वर्ष संस्थेत काम केलेले असल्याने व आवश्यक असलेले उच्च शिक्षणही आपल्याकडे असल्याने आपण तज्ज्ञ संचालक म्हणून निवडीस पात्र आहोत, त्यामुळे आपणच अर्ज माघारी घेतो असे सांगत आपला माघारीचा अर्ज सहकारी उपनिबंधकांच्या कार्यालयाकडे पाठवला. मात्र सेनापतीची माघार अमान्य असल्याचे सांगत संगमनेरातील प्रतिथयश व्यापारी आणि हजारोंशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या श्रीगोपाळ पडताणी यांनी रस्त्यातच मालपाणी यांचा अर्ज फाडून आपलाच माघार अर्ज दाखल केला आणि बँकेने इतिहास घडवला. एकीकडे संस्थेच्या 58 वर्षांच्या इतिहासात हा आनंदाचा क्षण असताना, दुसरीकडे मात्र त्यासाठी श्रीगोपाळ पडताणींसारख्या लढवय्या शिलेदाराला माघार घ्यावी लागल्याने ‘बिनविरोध’ होवूनही ही निवडणूक सभासदांच्या मनाला चटका लावणारी ठरली.
या सर्व गोष्टींवरुन सध्या समाज माध्यमात सभासदांकडून तिखट चर्चा सुरु असून समाजातील काहीजण पदांच्या वैयक्तिक लालसेतून शारदा पतसंस्था, महेश पतसंस्था, मर्चन्ट्स बँक, नगरपालिका, व्यापारी असोसिएशन, माहेश्वरी सभा अशा अनेक संस्थांमध्ये पदासाठी ‘हट्ट’ करतात आणि निवडणुका जाहीर होताच आपली उमेदवारी दाखल करतात. हे योग्य की अयोग्य? असा सवाल आता विचारला जात असून बिनविरोध प्रक्रियेत सभासदांनी अगदी स्पष्टपणे दोनवेळा नाकारलेल्या उमेदवारासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडलेला उमेदवार माघार घेतो हा जनादेशाचा अवमान नाही का? या घटनाक्रमात भविष्यात सभासदांनी नाकारुनही केवळ हट्टाच्या जोरावर अशा व्यक्ती संचालक होणार का? असे विविध सवालही या चर्चेतून विचारले जात आहेत. बिनविरोध निवडणूक स्वागतार्ह, सामाजिक कटूता आणि संस्थेचा खर्च वाचवणारी असली तरीही या प्रक्रियेने चुकीचे पायंडेही पडता कामा नये असे मतही अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.