पत्र देऊन साधे चरही उकरले जात नाही ः डॉ. विखे विरोधकांना टोला; ऑगस्टमध्ये पंतप्रधान उद्धाटनासाठी येणार

नायक वृत्तसेवा, राहुरी
‘नुसते पत्र देऊन साधे चर किंवा नाल्याही उकारल्या जात नाहीत, तर धरण कसे होणार? त्यांच्या बातम्यांकडे केवळ मनोरंजन म्हणूनच पाहा. पत्राने धरण होत असतील, तर आमचे किती तरी तळे, चर उकरणे अजून बाकी आहे. त्यासाठी पत्र द्या आणि काम होते का ते पाहा,’ असा उपरोधिक टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या नूतन पदाधिकार्यांची नुकतीच निवड झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉ. विखे येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की धरणाचे जे स्वप्न नगर जिल्ह्याच्या अकोले, संगमनेर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकर्यांनी पाहिले, ते पूर्णत्वास आले आहे. त्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य लाभले. गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष आणि अनेक लोकप्रतिनिधींचा सहभाग धरणाच्या व कालव्यांच्या कामात प्रदीर्घ राहिला आहे. या विषयात प्रत्येकाचे योगदान आहे.

पण प्रामुख्याने मी असे समजतो, की माझ्या राजकीय कारकीर्दीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जी बैठक झाली. त्यामध्ये कालव्याच्या पहिल्या पाच किलोमीटरच्या प्रश्न होता. त्याचा तोडगा या बैठकीत निघाला. मग खरे काम सुरू झाले. आज तेच पाणी आता येत आहे. पाच किलोमीटरचे काम झाले नसते, तर पाणी कधीही आले नसते. यात आमच्यासह अनेकांचा प्रदीर्घ संघर्ष आहे. जिरायती परिसरात पाणी आल्यामुळे या भागातील शेतकरी आता पाण्यापासून वंचित राहणार नाहीत. सध्या फक्त कालव्यांची चाचणी होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. आता फक्त डाव्या कालव्याची चाचणी होईल. उजवा कालवा दोन महिन्यांनी पूर्ण होणार आहे. दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण होतील. त्यानंतर पूर्ण प्रकल्पाचे एकत्रित उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
