संगमनेर तालुक्यातील सरासरी रुग्णगतीही खालावली! महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांच्या तुलनेत आत्ताच्या पाच दिवसांत मोठी घट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम असतांना आज संगमनेर तालुक्यासाठीही दिलासादायक वृत्त आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची रुग्णवाढ नोंदविणार्‍या संगमनेर तालुक्यातील रुग्णवाढीलाही आज ब्रेक लागला असून तब्बल सात दिवसांनंतर दैनिक रुग्णांची संख्या दोनशेपेक्षा खाली आली आहे. त्यासोबतच महिन्याभरात पहिल्यांदाच मागील पाच दिवसांत समोर आलेली रुग्णसंख्या निचांकी ठरली असून सुरुवातीच्या पाच दिवसांच्या तुलनेत सरासरीत तब्बल शंभर रुग्णांची घट झाली आहे. आजच्या अहवालातून शहरातील संक्रमण जवळपास नियंत्रणात आल्याचे चित्र असून एकूण 171 रुग्णांपैकी दिडशे रुग्ण ग्रामीणभागात आढळले आहेत.


आज सलग दहाव्या दिवशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या खाली येण्याची श्रृंखला अव्याहत राहीली. त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेगही नियंत्रणात आल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. मागील 25 दिवसांत जिल्ह्यात सरासरी 3 हजार 117 रुग्ण या गतीने 77 हजार 930 रुग्णांची भर पडली. मात्र मागील दहा दिवसांचा विचार केल्यास सरासरी 2 हजार 422 रुग्ण या वेगाने 24 हजार 217 रुग्ण आढळले आहेत. यावरुन मागील पाच दिवसांत सरासरी तब्बल सातशे रुग्णांची प्रतिदिवस घट झाली आहे. जिल्ह्यात आज समोर आलेल्या रुग्णांमध्ये तिनशेहून अधिक रुग्ण एकट्या श्रीरामपूर तालुक्यात तर दोनशेहून अधिक रुग्ण एकट्या पाथर्डी तालुक्यातून समोर आले आहेत. उर्वरीत सर्व तालुक्यांतील रुग्णसंख्या 171 पेक्षा खाली आहे.


संगमनेर तालुक्यातही मागील 25 दिवसांत सरासरी 314 रुग्ण या गतीने 7 हजार 846 रुग्णांची भर पडली. त्या मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत सरासरी 344.2 या वेगाने 1 हजार 721, दुसर्‍या पाच दिवसांत सरासरी 363.4 या गतीने 1 हजार 867, तिसर्‍या पाच दिवसांत सरासरी 307 रुग्ण या गतीने 1 हजार 535 रुग्ण, चौथ्या पाच दिवसांत सरासरी 293 रुग्ण या गतीने 1 हजार 464 रुग्ण तर मागील पाच दिवसांत सरासरी 262 रुग्ण या गतीने तालुक्यात 1 हजार 309 रुग्णांची वाढ झाली आहे. आजही शासकीय प्रयोगशाळेच्या 65, खासगी प्रयोगशाळेच्या 19 आणि रॅपीड अँटीजेनच्या 87 अहवालातून शहरातील अवघ्या 21 जणांसह तालुक्यातील 171 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.


त्यात संगमनेर शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील 54 वर्षीय महिला, बसस्थानक परिसरातील 39 वर्षीय महिला, सावताळी नगरमधील 52 वर्षीय इसम, इंदिरा नगरमधील 30 वर्षीय तरुण, सागर सोसायटीतील 41 वर्षीय महिला, संजय गांधी नगरमधील 45 वर्षीय इसम, रहेमतनगर मधील 82 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम, साईनगर मधील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, परदेशपूर्‍यातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सुकेवाडी रोडवरील 24 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालक व संगमनेर असा उल्लेख असलेल्या 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 व 54 वर्षीय इसम, 32, 29 व 26 वर्षीय तरुण आणि 69, 60 व 49 वर्षीय महिलांचा समावेश आहे.


जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत सुरु असलेली घट आजही कायम असून जिल्ह्यात आज अवघे 2 हजार 191 रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधीक श्रीरामपूर तालुक्यात 320 तर पाथर्डी तालुक्यात 219 रुग्ण सापडले. त्या खालोखाल संगमनेर 171, नेवासा 159, राहाता 158, पारनेर 157, श्रीगोंदा 156, नगर ग्रामीण 155, शेवगाव 151, कोपरगाव 121, अहमदनगर महापालिका क्षेत्र 108, जामखेड 102, राहुरी 78, कर्जत 57, अकोले 44, इतर जिल्ह्यातील 26, भिंगार लष्करी परिसरातील सात आणि लष्करी रुग्णालय व इतर राज्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.


बाजारात फिरणारा कोविड आता पाच टक्क्यांवर..
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणात एकसारखी घट होत असल्याचे प्राप्त आकडेवारीतून दिसत आहे. मात्र संगमनेरातील पॉझिटिव्ह रुग्ण समोर येण्याची सरासरी गती कायम असल्याने तालुक्यावर चिंतेचे मळभ अद्यापही दाटलेले आहेत. अशा चिंताजनक स्थितीत संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला असून शहरातील रस्त्यावर फिरणारा कोविड आता आठ टक्क्यावरुन पाच टक्क्यावर आला आहे. आज भरगच्च गर्दीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच पालिका प्रशासनाने रॅपीड अँटीजेन चाचणी पथक उभे करुन बाजार समितीत येणार्‍या 156 जणांचे नाकातील स्राव घेवून त्याची चाचणी केली. त्यातून अनपेक्षितपणे अवघ्या आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आजच्या एकूण चाचण्या आणि त्यातून समोर आलेले रुग्ण पाहता रॅपीड अँटीजेनद्वारा रस्त्यावर भटकणार्‍यांच्या चाचण्यातून कालपर्यंत समोर येणारा सरासरी वेग आज तब्बल तीन टक्क्यांनी ढासळल्याचे समाधानकारक चित्र दिसले.


पॉझिटिव्ह आलेले आठही रुग्ण चाचणीपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत निघाले होते, आज प्रशासनाने या ठिकाणी चाचणी केंद्र उभे केले नसते तर कदाचित या आठ जणांच्या संपर्कात येवून आणखी कितीजण बाधित झाले असते याची चर्चा यावेळी मार्केट कमिटीच्या परिसरात सुरु होती. आज सकाळपासून सुरु झालेल्या या चाचणी मोहिमेच्या वेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आदी उपस्थित होते.

Visits: 6 Today: 1 Total: 30591

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *