मोकळ्या जागांतील झाडाझुडूपांमुळे रोगप्रसाराची शक्यता पालिकेने साफसफाई करण्याची पुरोहित प्रतिष्ठानची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक बखळ जागांवर गाजरगवत व तत्सम उपद्रवी झाडे झुडूपे वाढली असून त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून पालिकेने अशा जागांची साफसफाई करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मानवी आरोग्य हा सध्या चिंतेचा विषय असून त्यात वाढीव आजारांची भर पडू नये, यासाठी ही कारवाई जलदगतीने व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आजवर अशा स्वरूपाची मागणी अनेकवेळा करूनही पालिका प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे ही गोष्ट अतिशय चिंताजनक असून संताप आणणारी आहे. नागरिकांकडून कर वसुलीच्या बाबतीत कडक धोरण राबवणारे नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत मात्र अतिशय बेफिकीर असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन अस्तित्वात आहे की नाही अशी शंका यावी इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे असे निवेदनात म्हंटले आहे.
संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे अनेक जागा काही ना काही कारणाने मोकळ्या पडून आहेत. जागामालकांचे दुर्लक्ष आणि बेफिकिरीमुळे या जागांमध्ये रान माजले आहे. हे रान कीटकांचे तसेच उंदीर, घुशी, साप, डुकरे यांचे आश्रयस्थान बनले आहे. सध्याची परिस्थिती बघता याकडे डोळेझाक करणे परवडणारे नाही. अशा जागांचा दुरुपयोग देखील समाजकंटक अथवा नशापान करणारे करू शकतात. अशा अनेक जागी मोकाट कुत्री लपून बसतात व अचानक नागरिकांवर धावतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या जागी डासांची निर्मिती होऊन त्याचा त्रास सर्वांना होऊ शकतो.
अशा जागांच्या मालकांना पालिकेने कडक शब्दांत समज देऊन त्यांच्याकडून जागा साफ करून घ्यावी. जे जागामालक ऐकणार नाहीत त्यांच्या जागा पालिकेने स्वतःच्या यंत्रणेमार्फत साफ करून त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल करावा. कारण कोणाच्या तरी बेजबाबदारपणे वागण्याचा त्रास निष्पाप नागरिकांना होऊ नये एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे असे निवेदनात म्हंटले आहे. पालिका स्वच्छतेचे कार्य करीत असताना जागा मालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आरोग्यदायी वातावरण निर्मितीला हातभार लावला पाहिजे असेही निवेदनात म्हंटले आहे.