मालपाणी उद्योग समूहाला सामाजिक उत्तरदायित्वाचा सर्वोच्च पुरस्कार! राजभवनात पार पडला सोहळा; राज्यपालांकडून सामाजिक कार्याचे कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील औद्योगिक क्षेत्राकडून समाजाच्या हितासाठी राबविल्या जाणार्या सामाजिक उपक्रमांमध्ये संगमनेरच्या मालपाणी उद्योग समूहाचा ठसा उमटला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत शासनाच्यावतीने मालपाणी उद्योग समूहाला यावर्षीच्या ‘सीएसआर हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवनात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात उद्योग समूहाचे संचालक आशीष मालपाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शासनाकडून झालेला गौरव उत्साह वाढवणारा असून यापुढे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याची प्रतिक्रिया यावेळी मालपाणी यांनी व्यक्त केली.

नवभारत-नवराष्ट्र माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या सोहळ्यात विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवभारत माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदिंसह औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. औद्योगिक प्रगती करीत असतानाच सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या आणि सातत्याने राबवून कर्तव्यपूर्ती केल्याबद्दल नवभारत समूहाच्यावतीने मालपाणी उद्योग समूहाला गौरविण्यात आले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आशीष मालपाणी यांनी उद्योग समूहाकडून राबविल्या गेलेल्या विविध समाजसेवी उपक्रमांची माहिती दिली. मागील 25 वर्षांपासून केवळ एक रुपयांत होणारा सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळा, नाममात्र दहा रुपयांत तज्ज्ञ डॉक्टरांच्यावतीने तपासणी आणि सवलतीच्या दरात औषधांची व्यवस्था असलेले मालपाणी हॉस्पिटल, कोविड संक्रमणाच्या कालावधीत मालपाणी हॉस्पिटलकडून झालेली रुग्णसेवा, या कालावधीत उद्योग समूहाच्यावतीने पुण्यात उभारण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत जयपूर फूट आणि प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन याशिवाय कोविड संक्रमणाशी लढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या सहाय्यता निधीत भरीव आर्थिक योगदान देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योग समूहाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान दिल्याचे सांगत मालपाणी यांनी संगमनेरात श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून सुरु असलेल्या रुग्णसेवेचाही यावेळी उल्लेख केला. यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही आपले योगदान देताना उद्योग समूहाने संगमनेर महाविद्यालयाला भरीव योगदान देताना सुसज्ज संस्कृत संशोधन केंद्र सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योग समूहाने संगमनेर शहर स्वच्छतेसाठी राबविलेला उपक्रम पथदर्शी ठरल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनातही उद्योग समूहाने मोठे काम केल्याचे सांगत कपारेश्वराच्या माळरानावर लावण्यात आलेल्या 51 हजार वृक्षांमुळे त्या परिसराचा कायापालट झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला.

संगमनेरच्या समाजाशी एकरुप झालेल्या मालपाणी उद्योग समूहाने जलजागृतीसाठी केलेले काम, दरवर्षी लाखो रोपांचे विनामूल्य वितरण, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्या गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, गोरगरीब रुग्णांना दुर्धर आजार आणि खर्चिक शस्त्रक्रियांसाठी मदत, धार्मिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा विषयक आणि राष्ट्रीय हिताच्या उपक्रमांना सातत्यपूर्ण आर्थिक सहयोग, संगमनेर, पाथर्डी व पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्य, संगणक, स्वच्छ पाण्याची यंत्रे व अन्य उपयोगी साहित्याचे वाटप, जिल्हा रुग्णालयास संगणक संच अशा वेगवेगळ्या उपक्रमातून मालपाणी उद्योग समूह आपले सामाजिक उत्तरदायित्व जोपासत असल्याचेही आशीष मालपाणी यांनी यावेळी सांगितले. उद्योग समूहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांचा समाजसेवेचा वारसा मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजय, मनीष, गिरीश, यशोवर्धन, जय व हर्षवर्धन मालपाणी जोमाने पुढे चालवत असल्याचेही मालपाणी यांनी सांगितले.

औद्योगिक घराण्यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करताना समाजहिताचे उपक्रम राबवावे असे अपेक्षित असते. मालपाणी उद्योग समूह गेली अनेक दशके समाजासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच मालपाणी परिवारातील सदस्यांनी संगमनेरातील विविध सामाजिक, सहकारी व शैक्षणिक संस्थांमध्येही नेत्रदीपक काम करताना अशा संस्थांना प्रगतीपथावर नेले आहे.
