शारदा सहकारी पतसंस्थेला 4 कोटी 35 लाखांचा विक्रमी नफा गिरीश मालपाणी; पारदर्शकतेच्या जोरावर संस्थेच्या ठेवी दोनशे कोटींवर नेण्याचा संकल्प

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या व्यापार क्षेत्राला दिशा देणार्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदार व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आगामी वर्षभरात संस्थेतील ठेवींचा आकडा दोनशे कोटींच्या पार नेण्याचा संकल्प आहे. विविध ग्राहकोपयोगी सुविधा, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार आणि उच्च कोटीची कामकाज प्रणाली यामुळे आधुनिक संस्थांच्या पंक्तीतही संस्थेने भरारी घेतली आहे. ठेवीदारांच्या याच विश्वासाच्या जोरावर संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात 169 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडतांना विक्रमी 4 कोटी 35 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी दिली.

संस्थेच्या 31 मार्च, 2023 अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना विद्यमान चेअरमन विशाल पडताणी म्हणाले, कोविड संक्रमणाच्या कालावधीनंतर जगभरात निर्माण झालेली आर्थिक मंदी, शेतीमालाचे घसरते भाव अशा स्थितीतही ठेवीदार व ग्राहकांनी संस्थेवर विश्वास ठेवल्याने संस्थेच्या ठेवी वाढल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने 297 कोटी 37 लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला असून 128 कोटी 55 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संक्रमण, आर्थिक मंदी अशा स्थितीतही संस्थेने आपल्या ग्राहकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा सतत प्रयत्न केल्याचे व्हा. चेअरमन सोमनाथ कानकाटे यांनी सांगितले. गरजू व व्यवहारी कर्जदार या संस्थेच्या संस्थापकांच्या धोरणाचा अवलंब केल्याने गेल्या आर्थिक वर्षात संस्थेची थकबाकी नगण्य ठेवण्यातही संचालक मंडळाने यश मिळवल्याचे कानकाटे यांनी सांगितले. 31 मार्च अखेर संस्थेतील ठेवींचा आकडा 168 कोटी 81 लाखांवर गेला असून आगामी आर्थिक वर्षात तो दोनशे कोटीच्या पार नेण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांनी संचालक मंडळावर विश्वास दाखविल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी, चेअरमन विशाल पडताणी, व्हा. चेअरमन सोमनाथ कानकाटे यांच्यासह संचालक मंडळातील डॉ. योगेश भुतडा, कैलास आसावा, सीए. नारायण कलंत्री, सुमीत अट्टल, राजेश लाहोटी, रोहित मणियार, राजेश रा. मालपाणी, कैलास राठी, अमर झंवर, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदीश टोकसे, लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे यांच्यासह व्यवस्थापक माधव भोर, सहाय्यक व्यवस्थापक विलास सांगळे व कर्मचारी वृंदांनी आभार मानले आहेत.
