आनंदी रस्त्यांवर संगमनेरकरांनी केली धमाल रोटरीच्या अनोख्या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रोटरीच्या 118 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब संगमनेर तर्फे आनंदी रस्ते या बहुप्रतिक्षीत उपक्रमाचे आयोजन रविवारी (ता.26) करण्यात आले होते. या उपक्रमास संगमनेरकरांचा भरभरुन प्रतिसाद लाभला. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या रोटरी क्लबने धकाधकीच्या जीवनात संगमनेरकरांना काही आनंदी क्षण मिळावेत या हेतूने हे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासमवेत संगमनेरचे नागरिक, बाळगोपाळ, रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावर्षी या उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते. परिसराची साफसफाई, रस्त्यांवर आकर्षक चित्र, सजावट, रंगीबिरंगी फुगे, मैदानावर, रस्त्यांवर खेळले जाणारे लिंगोरचा, अप्पारप्पी, लंगडी, खो-खो, गोट्या, भोवरा, क्रिकेट, बॅडमिंटन, सापसिडी तसेच मल्लखांब, दांडपट्टा यांसारखे मर्दानी खेळ हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य होते. तर झुंबा डान्स हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण होते. यावर्षी 1500 चौरस फूट मापाचा राष्ट्रध्वज नागरिकांच्या सहकार्याने फडकविण्यात आला. यामुळे सर्व नागरिक काही क्षण भारावून गेले होते. 6 फूट उंचीचे रोटरी व्हील, व्हिंटेज जीप, एस 23 मोबाईल असे अनेक सेल्फी पॉईंट याठिकाणी उभारण्यात आले होते.

शहरातील कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यामध्ये नितीन जेधे यांचे झुंबा डान्स, शुभम तवरेज यांचा ऑर्केस्ट्रा, अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्रे, प्रदीप तापडे यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा असे सादरीकरण करण्यात आले. कोविड महामारीमुळे गेली तीन वर्षे हा प्रकल्प राबविला गेला नव्हता, त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता होती. जनतेमधून निधी गोळा करुन हा प्रकल्प राबविला जातो. यावर्षी मे. के. के. थोरात, आर. एम. सी. यांनी या प्रकल्पाचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते. तसेच इतरही उद्योजकांनी या प्रकल्पासाठी सढळ हाताने मदत केली होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ऋषीकेश मोंढे, सचिव आनंद हासे, प्रकल्प संस्थापक दिलीप मालपाणी, प्रकल्प प्रमुख रवींद्र पवार, अरविंद कासट, गगन थोरात, सौरभ म्हाळस, प्रकल्प समितीतील अजित काकडे, योगेश गाडे, नरेंद्र चांडक, ओंकार सोमाणी, महेश वाकचौरे, भारतभूषण नावंदर, डॉ. प्रमोद राजुस्कर, डॉ. विनायक नागरे, प्रमोद मणियार, समीर शहा, मोहित मंडलिक, संजय कर्पे, अमित पवार, डॉ. विकास करंजेकर, संकेत काजळे, संदीप गुंजाळ, मनमोहन वर्मा आदी सदस्यांनी मेहनत घेतली.
