भानसहिवरे गावात रेशनिंगचा अवैध साठा पकडला पुरवठादाराकडून स्थानिक नागरिकांना मारहाण


नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील भानसहिवरे गावात अवैधरित्या साठवून करून ठेवलेला रेशनिंगचा गहू आणि तांदूळ स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी (ता.21) पकडला. सदरचा साठा हा तालुका पुरवठादाराने अवैधरित्या साठवून ठेवला होता. दरम्यान रेशनिंगचा साठा पकडताच संबंधित तालुका पुरवठादाराने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पुरवठा पकडणार्‍या स्थानिक नागरिकांना मारहाण केली आहे. यातील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यात रेशनिंगचा पुरवठा करणार्‍या पुरवठादाराचे भानसहिवरे गावात गोडावून आहे. याच गोडावूनमध्ये अवैधरित्या गहू आणि तांदूळ साठवून ठेवला होता. याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी सुरुवातीला गाडीमध्ये भरून जाणारे सुमारे 157 तांदळाचे कट्टे पकडले. नंतर गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला गहू आणि तांदूळ पकडला. याची माहिती त्या पुरवठादाराला कळताच त्याने त्याच्या सहकार्‍यांना बोलवून त्या नागरिकांना मारहाण केली. त्यातील दोघांना गंभीर मार लागला आहे. दरम्यान याची माहिती सोशल मीडियावरून तहसीलदार सुरेशकुमार सुराणा यांना देण्यात आली. त्यांनी व पुरवठा अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कारवाई सुरू होती.

दरम्यान, साठवणूक करून ठेवलेला गहू आणि तांदूळ पकडला का? यासंदर्भात तहसीलदार सुरेशकुमार सुराणा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भानसहिवरे गावात हा साठा पकडला आहे. हा साठा कोणाचा व किती आहे याची माहिती देण्यास त्यांनी स्पष्ट नकार देत थांबा, वेळ लागेल असे सांगितले. सदरचा साठा कोणाचा आहे, याची सुद्धा माहिती त्यांनी दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *