चंदनेश्वरमधील मेळावा म्हणजे देशभक्तीचा कुंभमेळा ः रहाणे गेल्या वीस वर्षांमध्ये 155 विद्यार्थी करताहेत देशसेवा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चंदनापुरीमधील चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 1999 ते 2019 पर्यंत जे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी होते ते सध्या पोलीस व सैन्य दलात कर्तव्य बजावत आहे. त्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला, त्यामुळे जणू कुंभमेळाच भरला होता असे गौरवोद्गार मधुकर रहाणे यांनी काढले.

या मेळाव्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे यांनी संबोधित केले. याप्रसंगी सह्याद्री अकॅडेमीचे प्रमुख अमोल रहाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त एम. एम. फटांगरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीपर गीत साजरे झाले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्राचार्य अशोक खेमनर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आनंद कढणे, विठ्ठल कढणे, रामदास रहाणे, अनिल कढणे, अशोक रहाणे, आचार्य बाबुराव गवांदे, रणजीत ढेरंगे, मधुकर वाळुंज, पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गेल्या 20 वर्षांत पोलीस व लष्करी सेवेत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, डायरी, गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे मधुकर रहाणे म्हणाले, मी गावी आल्यानंतर पुन्हा माहेरी आल्यासारखे वाटते. कितीही व्यस्त असलो तरी शाळेचे निमंत्रण मी कधीही टाळत नाही. याचे कारण गावामुळे मी व्यावसायिक झालो, स्वतःच्या पायावर उभा राहिलो. शाळेने नवीन उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा तयार होते. आजचा प्रसंग हा उल्लेखनीय असून त्यातून ऊर्जा मिळते. सह्याद्री अकॅडेमीचे संचालक अमोल रहाणे म्हणाले, रहाणे नावाला जे वलय निर्माण झालं ते सर्व श्रेय मधुकर रहाणे यांना जाते. कारण त्यांनी त्यांचा मुलगा जगविख्यात क्रिकेटर अजिंक्य रहाणे घडवला. हे आमच्या गावाचे भूषण आहे. गुरु फटांगरे यांनी आदर्श विद्यार्थी घडवले. मित्रांमुळे नम्रता शिकलो. सुहासमुळे गावातील चार मुले उपनिरीक्षक झाली. तो सुद्धा गावचा आदर्श आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. एम. फटांगरे म्हणाले, माझे लाडके विद्यार्थी मधुकर रहाणे व अमोल रहाणे हे प्रमुख पाहुणे आज आहे हा आनंद आहे. पदावर असणार्‍या माणसाला कोणाला तरी दुखावावेच लागते. त्यामुळे अनेक शत्रू तयार होतात. आयुष्यात आपण किती संपत्ती मिळवली यापेक्षा सर्व माजी विद्यार्थी हीच खरी माझी संपत्ती आहे.

यावेळी बाबुराव गवांदे, माजी विद्यार्थी बाळासाहेब ढेरंगे, अर्चना फटांगरे, दामू वाघमारे, सुमेध भालेराव, प्रमिला रहाणे, सुहास रहाणे (पी. एस. आय. मुंबई), माधुरी पावसे, दीपक रहाणे (पी. एस. आय. पुणे ग्रामीण) यांनी मनोगते व्यक्त केली. आभार प्रदर्शन उपप्राचार्य कैलास रहाणे यांनी मानले. सूत्रसंचालन राजेंद्र डुबे यांनी केले. या मेळाव्याला गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *