वीज कर्मचार्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार! लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी संबंध; गर्भपाताच्या गोळ्याही खावू घातल्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळेत जाता-येता झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर पीडितेने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन भागवतवाडीत राहणार्या सागर दत्तू भागवत या वीज वितरण कंपनीत सेवेत असलेल्या वीज कर्मचार्यावर अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने वीज मंडळासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेचा घटनाक्रम सुमारे सात महिन्यांपूर्वी सुरु झाला. तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एका सोळावर्षीय विद्यार्थीनीची महाविद्यालयाच्या रस्त्यावरच असलेल्या वीज कंपनीच्या उपकेंद्रावर कार्यरत असलेल्या सागर दत्तू भागवत (रा.भागवतवाडी) या तरुणाशी ओळख झाली. त्यातून त्याने संबंधित विद्यार्थीनीचा मोबाईल क्रमांक घेवून त्यावरुन तिच्याशी संभाषण साधण्यास व वेगवेगळे संदेश पाठविण्यास सुरुवात केली. या प्रकारातून काहीशी जवळीक निर्माण झाल्यानंतर त्याने एके दिवशी ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे’ सांगत तिला आपल्या जाळ्यात ओढले.
त्या अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादित केल्यानंतर त्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्या अल्पवयीन विद्यार्थीनीला रात्री मोबाईलवर संदेश पाठवून भेटण्यास बोलावले. त्यावेळी घरातील लोकांची नजर चुकवून ती विद्यार्थीनी परिसरातील एका बंद असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये पोहोचली. तेथेच सागर भागवत याने प्रेमाच्या आणाभाका घेत तिच्याशी बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या घटनेच्या महिनाभरानंतर संबंधित विद्यार्थीनीचा मासिक धर्म चुकल्याने ती घाबरली व तिने सदरचा प्रकार आरोपी सागर भागवत याला सांगितला.
त्यावेळी त्या दोघांनी गर्भधारणा तपासणीसाठी वापरली जाणारी पद्धत वापरुन पाहिले असता त्यातून सदरील विद्यार्थीनी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर दुसर्या दिवशी त्याने सदर विद्यार्थीनीला सोबत घेवून संगमनेर गाठले. यावेळी त्याने बसस्थानकासमोरील एका औषध दुकानातून पाच गोळ्या आणून त्या विद्यार्थीनीला दिल्या. त्यानुसार गोळ्या घेतल्यानंतर पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये त्या मुलीचा मासिक धर्म सुरळीत झाल्याने संबंधित वीज कर्मचार्याने आपले चाळे पूर्ववत केले. त्यातूनच पाच-सहा दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी सदर मुलीचे वडील शेतात पाणी भरण्यासाठी, भाऊ कामानिमित्त बाहेर व आई घरात झोपलेली असतांना त्याने पीडितेला संदेश करुन बोलावून घेतले व पुन्हा तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
तेथून पुन्हा घरी परतत असतांना पीडितेच्या वडिलांनी तिला पाहिले असता चौकशी केली. त्यातूनच या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले. मात्र इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी तत्काळ तक्रार दाखल न करता आज (ता.2) याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या तळेगाव दिघे उपकेंद्रात कार्यरत कर्मचारी सागर दत्तू भागवत (रा.भागवतवाडी) याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 376 (2) (आय), 313 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पोक्सो) कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने वीज कंपनीस संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.