भंडारदर्याच्या पाणलोटात सलग दुसर्या दिवशीही पावसाचा झंझावात! घाटघरमध्ये साडेसात इंच पाऊस; आदिवासी पट्ट्यात भात लागवडीची लगबग
नायक वृत्तसेवा, अकोले
संपूर्ण जून महिना प्रतीक्षा करायला लावणार्या मान्सूनने गेल्या आठच दिवसांत धरणांच्या पाणलोटातील नूर पालटला आहे. एकीकडे मुळा खोर्यात सर्वदूर बरसणार्या आषाढसरींनी आंबीत व पिंपळगाव खांड प्रकल्प तुडूंब केले असताना दुसरीकडे भंडारदर्याच्या पाणलोटातील पावसाने धरणाचा पाणीसाठा हलता इेवला आहे. घाटघरमध्ये तर सलग दुसर्या दिवशी पावसाने विक्रम केला असून गेल्या चोवीस तासांत तब्बल साडेसात इंच पावसाची नोंद झाली आहे. भंडारदर्याच्या पाणलोटात पावसाचा झंझावात टिकून असल्याने आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत धरणात 335 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले असून एकूण पाणीसाठा 3 हजार 608 दशलक्ष घनफूटावर पोहोचला आहे. पावसाचा जोर वाढल्याने आदिवासी पाड्यातील धावपळ वाढली असून भात लागवडीच्या (आवणी) कामांना वेग आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधीक पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्या मुळा व प्रवरा नदीच्या खोर्यात मान्सूनने दीर्घकाळ ओढ दिली होती. वेगवेगळी वादळे आणि त्यातून घडलेल्या वातावरणीय बदलांनी एरव्ही जूनच्या मध्यापर्यंत पाणलोटात दाखल होणार्या मान्सूनचा प्रवास लांबवला. त्यामुळे आदिवासी पट्ट्यासह धरणांच्या लाभक्षेत्रातही चिंता निर्माण झाल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून मान्सूनच्या ढगांनी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांचे पाणलोट क्षेत्र व्यापले असून सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात जलवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत लाभक्षेत्रातील नागरीकांच्या चेहर्यावर दिसणारे चिंतेचे मळभ आता दूर सारले गेले आहेत.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेल्या 48 तासांपासून पावसाचा झंझावात सुरू आहे. जोरदार कोसळणार्या आषाढ सरींनी सह्याद्रीच्या कडेकपारीतील असंख्य छोट्या-मोठ्या ओढ्या-नाल्यांमध्ये जोश भरला असून भात खाचरे तुडूंब भरुन वाहू लागली आहे. उशिरा का होईना पाणलोटातील पावसाला जोर चढू लागल्याने आदिवासी पाड्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून भात लागवडीच्या (आवणी) कामांना वेग आला आहे. मागील 48 तासांत भंडारदर्याच्या पाणलोटातील घाटघरसह रतनवाडी, भंडारदरा, पांजरे, सांम्रद, उडदावणे अशा सर्वदूर तुफान जलधारा कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सोबतीला सोसाट्याचा वाराही रोऽरो करीत वाहत असल्याने वातावरणातील गारवाही कमालीची वाढला आहे. त्यामुळे एकीकडे भात लागवडीची लगबग सुरु असतांना दुसरीकडे आपली पाळीव जनावरे वाचवण्याचे आव्हान आदिवासी बांधवांसमोर उभे आहे.
गेल्या 24 तासांत मुळा खोर्यातील हरिश्चंद्रगडाच्या माथ्यासह कोथळे, पाचनई, पेठेचीवाडी, आंबित, शिरपुंजे, लहित, खडकी अशा सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या भागातील मरगळलेल्या ओढ्या-नाल्यांना भरतं आलं असून मुळानदीचे पात्रही फुगायला सुरुवात झाली आहे. मुळा खोर्यातील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आंबित लघु पाटबंधारे प्रकल्पासह कोतुळनजीकचा 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड प्रकल्प यापूर्वीच ओसंडल्याने मुळा नदीतून वाहणारे पाणी आता थेट मुळा धरणाच्या दिशेने झेपावू लागले आहे. गेल्या चोवीस तासांत वाढलेल्या पावसाने मुळेचे पात्रही फुगले असून आज सकाळी आठ वाजता कोतुळजवळील मुळा नदीपात्रातून 2 हजार 829 क्युसेक वेगाने पाणी धावत होते.
मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाला जोर चढत असताना निळवंडे धरणाचे पाणलोट क्षेत्र मात्र अद्यापही जेमतेम पावसावरच आहे. कळसूबाईच्या गिरीशिखरांवर अजूनही आषाढसरींना वेग नसल्याने कृष्णवंतीचा प्रवाह अद्यापही सामान्य गतीने वाहत आहे. त्यामुळे प्रवरेच्या या उपनदीवर रंधा धबधब्याजवळ असलेल्या 112 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या वाकी लघु पाटबंधारे प्रकल्पात धिम्यागतीने पाण्याची आवक सुरू असून हा प्रकल्प तुडूंब झाल्याशिवाय निळवंडे धरणातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. आज सकाळी वाकी जलाशयात 62.27 दशलक्ष घनफूट पाणी होते, हा साठा प्रकल्पाच्या एकूण क्षमतेच्या निम्म्याहून काहीसा अधिक आहे. निळवंडेप्रमाणेच तालुक्याच्या उत्तरेतील आढळा धरणाच्या पाणलोटालाही अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या धरणाच्या वरच्या भागातील पाडोशी व सांगवी प्रकल्प अजूनही रिकामे आहेत. जोपर्यंत हे दोन्ही प्रकल्प तुडूंब होत नाहीत, तोपर्यंत आढळा धरणात नवीन पाणी दाखल होण्याची शक्यता दुर्मिळ असते. त्यामुळे तालुक्यातील सर्वात अशिरा भरणारे धरणा म्हणून आढळा धरणाकडे पाहिले जाते.
आज सकाळी 8 वाजता संपलेल्या चोवीस तासात पाणलोटातील (कंसात 1 जूनपासूनचा एकूण पाऊस) घाटघर येथे 191 मिलीमीटर (1147 मि.मी), रतनवाडी 164 मिलीमीटर (1134 मि.मी), भंडारदरा 109 मिलीमीटर (637 मि.मी), वाकी 87 मिलीमीटर (450 मि.मी), निळवंडे 11 मिलीमीटर (328 मि.मी), कोतुळ एक मिलीमीटर (115 मि.मी), आढळा 04 मिलीमीटर (75 मि.मी) व अकोले 09 मिलीमीटर (200 मि.मी) पाऊस झाला असून पाणीसाठा मुळा 8 हजार 231 दशलक्ष घनफूट (31.65 टक्के), भंडारदरा 3 हजार 608 दशलक्ष घनफूट (32.68 टक्के), निळवंडे 3 हजार 602 दशलक्ष घनफूट (43.29 टक्के) व आढळा 413 दशलक्ष घनफूट (38.96 टक्के) झाला आहे. या चोवीस तासांत भंडारदर्यात 335 दशलक्ष घनफूट तर निळवंड्यात 28 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले.