आपल्याला सोडून गेलेल्यांचे आत्मपरीक्षण उद्धवजींनी करावे ः केसरकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे साई दर्शन; अजित पवारांचे केले कौतुक
नायक वृत्तसेवा, शिर्डी
पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. प्रेमाने मन जिंकावे लागते, जेव्हा घराला आग लागते तेव्हा अगोदर आग विझवावी लागते. अनेकजण आपल्याला सोडून गेले याचे आत्मपरीक्षण उद्धवजींनी करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करीत विरोधी पक्षनेते अजित पवारांचे मात्र त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी (ता.1) साईदर्शन घेऊन नववर्षाची सुरूवात केली. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या मात्र धर्म नाही बदलला. शब्दछल करण्यात काही महत्त्व नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बाहेरून कठोर असले तरी त्यांचं मन मात्र निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतील मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजितदादांसारखा असावा अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर असून कटूता कमी करणे उद्धवजींच्या हातात आहे. जेव्हा घर पेटते तेव्हा अगोदर आग विझवावी लागते, कशामुळे लागली ते नंतर बघू. अगोदर आपण आपलं घर सुरक्षित ठेवू असे मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याच दु:ख वाटलं नाही पण जे काही माध्यमात दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळ्यांचं उत्तर देईल. त्यांच्या आजूबाजूची लोक जे सांगतात त्यावर ते मत बनवत असतात. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही तर प्रेमाने मन जिंकावं लागतं शिंदेंनी 40 आमदारांची मने जिंकली. एक दोन दिवसांत उत्तर देईल. निश्चित काहीतरी घडलं. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. मी जसं आत्मपरीक्षण केलं तसं उद्धवजींनी करावं असा सल्ला केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.