साकूरच्या सामाजिक कार्यकर्त्याला टोळक्याची बेदम मारहाण घारगाव पोलिसांत सुमारे दहा जणांवर गुन्हा दाखल; परिसरात उडाली खळबळ

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे या तरुणावर हिवरगाव पठार घाटात शुक्रवारी (ता.30) रात्री 8 वाजेच्या सुमारास घरी परतत असताना दोन गाड्यांतून आलेल्या अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्याबरोबर असलेला एक मित्र पळून गेला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी, सकाळी ग्रामसभेतही वादावादी झाली. यावेळीही त्यांना मारहाण करुन धमकी दिली.

साकूर ग्रामपंचायवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक शंकर खेमनर यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वीच या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यात एक विरोधी पक्षाचा सदस्य निवडून आला. तसेच काही उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले. त्यामुळे पदाधिकार्यांनी जोगेपठारचा पाणी पुरवठा बंद केला. यावरून इघे यांनी फेसबुकवर माहिती प्रसारित केली. तसेच शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत इघेंनी हाच मुद्दा उचलून धरला. त्यामुळे ग्रामसभेत इघे आणि पदाधिकार्यांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यावसान थेट त्यांना मारहाण आणि धमकीत झाले.

साकूर ग्रामसचिवालयात ग्रामसभा आयोजित केलेली होती. या ग्रामसभेस शंकर हनुमंत खेमनर, इंद्रजीत अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, हर्षद शंकर खेमनर, रफीक अब्दुल चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार, ग्रामसेवक नागेश पाबळे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सुनील इघे यांच्यासह 150 ते 200 ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी ग्रामस्थांच्यावतीने उभे राहून जोगेपठार येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत ग्रामसेवकास इघे यांनी प्रश्न केला असता शंकर हनुमंत खेमनर म्हणाले, तुझा येथे बोलण्याचा काहीएक संबंध नाही तू खाली बस. त्यावर त्यांना समजावून सांगितले की, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. माझा वैयक्तिक प्रश्न नाही तो जनतेचा हक्क आहे. त्याचा राग येऊन शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर, रफीक चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार आणि ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू जर आमच्याविरुध्द आवाज उठवला तर तुला कायमचा संपवून टाकीन. तू जर आमच्याविरुध्द पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही ग्रामसेवकाकरवी गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली.

याबाबत सुनील इघे यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास इघे व त्यांचे दोन मित्र परतत असताना हिवरगाव पठार घाटात आले असता अचानक दोन गाड्यांमधील 20-25 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढविला. इघे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका मित्राचा मोबाइल या टोळक्याने हिसकावून घेतला व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या गडबडीत त्यांच्याबरोबर असलेला दुसरा मित्र सटकला व तो घटनास्थळावरून गायब झाला. दूर गेल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर चक्रे फिरल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच हे टोळके पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमी इघे यांना संगमनेर येथे उपचारासाठी आणले होते. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले असल्याचे समजते.
