व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावी ः मालपाणी इनरव्हील क्लबतर्फे संगमनेर नगरपालिका शाळांना भरीव मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यश प्राप्त करायचे असेल व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट 313 च्या व्हाईस प्रेसिडेंट रचना मालपाणी यांनी केले.

संगमनेर नगरपालिका आस्थापनातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य म्हणून इनरव्हील क्लबतर्फे 539 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग तर व्यासपीठावर सचिव ज्योती पलोड, संपादक वैशाली खैरनार, उपाध्यक्षा डॉ. श्रद्धा वाणी उपस्थित होत्या.

प्रास्ताविक भाषणात नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांनी इनरव्हील क्लबच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करतानाच क्लबकडे नगरपालिका शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणी केली. त्या मागणीस रचना मालपाणी व प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी त्वरीत प्रतिसाद दिला. आपल्या भाषणात वृषाली कडलग म्हणाल्या की, गरजू व हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी इनरव्हील क्लब संगमनेर मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. इनरव्हील क्लबने जागतिक पातळीवरही स्वार्थ विरहित सेवेने केलेले सामाजिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. सूत्रसंचालन कांता शेंडे व पुष्पा रहाणे यांनी केले. यावेळी शिक्षण मंडळाचे जाहिद शेख, शिक्षक समितीचे कैलास गिते, मुख्याध्यापिका चंद्रभागा जाधव, सप्तसिंधू खोसे, भारती भवार, परविन मॅडम, फुलचंद लेंडे, वामन कळसकर, अर्जुन भवार, अरविंद सगभोर आदी उपस्थित होते.
