शेतकर्‍याच्या मुलाने पूर्ण केले फौजदार होण्याचे स्वप्नं! जिद्दीला सलाम; दहा वर्षात पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास..

 


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचं असेल त्यांनी रात्रीच्या झोपेत नव्हेतर दिवसा उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पहायला हवीत आणि पाहिलेलं स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी त्याला परिश्रमांची जोडही द्यायला हवी. यशाचा हाच मंत्र सोबत घेत अकोले तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या मुलाने किशोरवयात पाहिलेले स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्याला अजोड परिश्रमांची जोड दिली आणि दहा वर्षांपूर्वी पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झालेल्या या तरुणाने अखेर आपले फौजदार होण्याचे स्वप्नं पूर्ण केले. ध्येयाच्या दिशेने त्याने केलेला जिद्दीचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी दिशादर्शक ठरावा असाच आहे.

पोलीस दलातील विभागीय उपनिरीक्षकपदासाठी झालेल्या खात्यातंर्गत परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले साईनाथ भानुदास तळेकर पोलीस उपनिरीक्षक म्हणून घवघवीत गुणांनी उत्तीर्ण झाले. मूळच्या अकोले तालुक्यातील पैठणचे रहिवाशी असलेले तळेकर अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे जन्मापासूनच त्यांना गरीबीचा सामना करावा लागला. मात्र काबाडकष्ट आणि त्यातून मिळणारी दोनवेळची भाकरी यालाच जीवन मानायला त्यांनी अगदी लहान वयातच नकार दिला.

शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी मिळवावी आणि आपल्या जन्मदात्यांचे पांग फेडावे या विचारांतून त्यांची सतत सुरु असलेली धडपड पाहून त्यांच्या वडिलांनीही अन्य खर्चाला फाटा देत त्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यास सुरुवात केली. त्यातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डी. एड्चे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नेवासा येथील अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेतला. या दरम्यान लहानपणी त्यांनी पाहिलेले स्वप्नंही त्यांच्या सोबतच वावरत होते, मात्र संधी मिळत नसल्याने त्यांची प्रतीक्षा सुरु होती. डी. एड्चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने पोलीस दलातील शिपाई भरतीसाठी अर्ज दाखल केला आणि त्यासाठी त्यांची निवडही झाली.

सन 2012 मध्ये अहमदनगर पोलीस दलात रुजू झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना पाथर्डी पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी मिळाली. तेथून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना खात्यातंर्गत होणार्‍या फौजदार परीक्षेची जोरदार तयारी सुरु केली. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाणं जिल्ह्यातील व्यस्त ठाण्यांपैकी एक असल्याने अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळवण्यात अडचणी येवू लागल्या. मात्र कोणतीही तक्रार न करता त्यांनी मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीला पूर्ण न्यायही देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काम पाहून पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी त्यांच्यावर संपूर्ण पोलीस कंपनीची जबाबदारी सोपविली. याच कालावधीत देशात कोविड संक्रमणानेही कहर केला होता. मात्र तळेकर यांनी आपल्या कंपनीतील प्रत्येक सदस्याची शारीरिक व मानसिक क्षमता आणि कोविडसारख्या जीवघेण्या आजारात उभे राहण्याची स्थिती यांचा विचार करुन तरुण व ज्येष्ठ अंमलदारांच्या बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले. कोणत्याही कर्मचार्‍याला दीर्घकाळ एकाच कामावर कायम न ठेवता त्यांनी सातत्याने त्यात बदल केले. ज्यांना वेगवेगळ्या व्याधी आहेत, आजारपणातून बाहेर पडलेले आहेत अशा अंमलदारांना त्यांनी कार्यालयीन कामकाज सोपविले.

या कालावधीत ज्या कर्मचार्‍यांना कोविडचे संक्रमण झाले त्यांच्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी होती. त्यांच्यातील ही कुशलता पाहून पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांसह वरीष्ठ अधिकार्‍यांनीही त्यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. कोविडच्या संक्रमणात इतर कर्मचार्‍यांची काळजी वाहताना कोविडने त्यांनाही जखडले. त्यावर मात करुन ते पुन्हा उभे राहिले आणि सेवेत रुजू झाले. संक्रमण संपताच त्यांनी पुन्हा फौजदाराच्या स्वप्नांना गवसणी घातली आणि अखेर ते त्यात यशस्वीही झाले. या दहा वर्षांच्या कालावधीत अनेक प्रसंगात त्यांना यमदेवतेचेही दर्शन घडले. मात्र न डगमगता, न घाबरता त्यांनी त्यांनाही माघारी पाठवले.

त्यांच्या जीवनातील गेल्या दहा वर्षांचा हाच प्रवास थक्क करणारा आहे. या दरम्यान त्यांनी खात्यातंर्गत झालेली फौजदार पदासाठीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून ते त्यात उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गरीब शेतकर्‍याच्या पोटी जन्माला येणं हे जरी त्यांच्या हाती नव्हतं, तरी आपलं जीवन घडवणं हे मात्र आपल्याच हाती असतं हे त्यांनी आपल्या या प्रवासातून दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास आजच्या तरुणाईला नक्कीच दिशादर्शक ठरावा असाच आहे.

Visits: 99 Today: 3 Total: 1100108

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *