आंबीदुमाला येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला, गंभीर जखमी

आंबीदुमाला येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला, गंभीर जखमी
वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची शेतकर्‍यांची मागणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथील अनिल संभाजी मधे या तरुणावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. सदर घटना गुरुवारी (ता.12) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पठारभागात सतत बिबट्यांचे हल्ले होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आंबीदुमाला येथील सावकार शिंदे यांची शेती शिंदे वस्ती येथे असून अनिल मधे हा तरुण ही शेती वाट्याने करत आहे. गुरुवारी सकाळी शेतातील कांद्याच्या रोपाला पाणी भरण्यासाठी हा तरुण गेला असता पाणी भरत असतानाच बांदाच्या खाली असलेल्या गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणाच्या पायावर हल्ला केला. त्यामुळे त्याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने वडील संभाजी मधे हे धावत मुलाच्या दिशेने गेले. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली होती. घटनेची माहिती समजताच दत्तोबा शिंदे, सावकार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत अनिलला औषधोपचार करण्यासाठी बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेळीवरही हल्ला केला होता, परंतु शेतकर्‍याने शर्थ करत बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली. मात्र, पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले होत असतानाच नागरिकांवरही हल्ला केल्याने वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावे, अशी मागणी दत्तोबा शिंदे, सावकार शिंदे, विष्णू ढेरंगे, रंगनाथ राखुंडे, दत्तात्रय नरवडे, हनुमंत शिंदे, वसंत शिंदे, नाथा शिंदे, बबन शिंदे, कमळू शिंदे, योगेश देसले, एकनाथ काळे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *