विकृतीचा नाश करण्यासाठी समाजाने एकत्र यावे ः रुपाली चाकणकर संगमनेरातील ‘त्या’ घटनेचे राज्यभर पडसाद; भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही संताप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजातील विकृतींचा जो पर्यंत नायनाट होत नाही, तो पर्यंत अशा घटना घडतच राहणार आहेत. संगमनेरात अल्पवयीन मुलीवर आपल्याच वडिलांकडून झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. कायद्याचे राज्य आहे, पोलिसांनी आपली भूमिका वठवली असून आरोपीला तुरुंगात टाकले आहे. मात्र ज्यावेळी जन्मदात्या बापालाही आपलं नातं समजत नसेल तेव्हा समाजाने एकत्र येवून अशा वृत्तीचा नायनाट करण्याची गरज आहे. सदरचा प्रकार घृणास्पद असून त्याचा निवाडा द्रुतगती न्यायालयातच व्हावा यासाठी उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

बुधवारी संगमनेर शहरालगतच्या एका मोठ्या वसाहतीत राहणार्‍या एका नराधम पित्याने आपल्याच साडेअकरा वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. विविध प्रसार माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी संगमनेरात येवून पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करुन प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. यावेळी संगमनेर पोलिसांनी तत्काळ केलेल्या कारवाईबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.

यावेळी चाकणकर पुढे म्हणाल्या की, अशा घटनानंतर जनभावना संतप्त होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा प्रकरणाचा निवाडा जलदगती न्यायालयाद्वारा होण्याची आवश्यकता आहे. घटना घडून गेल्यानंतर न्यायासाठी समाज एकत्र येतो, चर्चा व आंदोलने केली जातात. मात्र त्याचवेळी घडलेल्या घटनेचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. त्यासाठी किमान अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी समाजाने एकत्र येवून प्रबोधन करण्याची गरज आहे, त्यातून अशा प्रकारच्या विकृतीचा नायनाट होवू शकतो असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची भेट घेवून चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. पो.नि.देशमुख यांनी आरोपीला तत्काळ अटक करुन गजाआड केल्याचे व न्यायालयाने त्याला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविल्याचे सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करतांना या प्रकरणाचा निवाडा द्रूतगती न्यायालयात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा व समाजातील अशा विकृतींना नेमका संदेश जावा यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी समोर आलेल्या या घटनेत पडसाद राज्यभरात उमटले. भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करताना ‘शीऽऽऽ अत्यंत किळसवाणं व घृणास्पद. पवित्र नात्याला कलंकित करणार्‍या या हरामखोराला सोडू नका’ अशा संतप्त शब्दात त्यांनी ट्विट करीत आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

Visits: 124 Today: 1 Total: 1115276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *