महापुरुषांना जातीधर्माच्या चौकटीत बसवू नका ः शेख भारतरत्न अबुल कलाम आझाद यांची 134 वी जयंती साजरी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतात सध्या महापुरुषांचे विभाजन सुरू असून संबंध मानव जातीसाठी जात धर्म प्रांताच्या पुढे जाऊन ज्या महामानवांनी काम केलं त्यांना एका चौकटीत बसवू नका असे प्रतिपादन व्याख्याते अर्शद शेख यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृहात भारतरत्न अबुल कलाम आझाद यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित जाहीर व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अब्दुल्ला हसन चौधरी, सुखदेव इल्हे, श्रीनिवास पगडाल, कारभारी देव्हारे, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान, जाविद युनूस शेख, मुजाहिद पठाण, जाविद शब्बीर शेख, माजी गटविकास अधिकारी बी. डी. पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
जोपर्यंत शिक्षण माणसाला माणूस बनवत नाही तोपर्यंत आपले जीवन निरर्थक आहे. आजची जयंती महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणारी नसावी तर त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा घेणारी असावी. भविष्य हे शिक्षणाने लिहिले जाते म्हणून सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने आपला बौद्धिक स्तर उंचविण्यासाठी शिक्षणाची आज नितांत गरज असून एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असीफ शेख व पदाधिकार्यांचे अर्शद शेख यांनी यावेळी कौतुक केले.
याप्रसंगी एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यवतीने दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. यावर्षीही कादिर अब्बास शेख यांना मौलाना आझाद आदर्श समाजरत्न पुरस्कार, इरफान अस्लम शेख यांना स्वर्गीय मिर्झा खालिद बेग पुरस्कार आदर्श समाजरत्न पुरस्कार, शौकत पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श आझाद पत्रकार पुरस्कार तर सुरेंद्र उर्फ नाना गुजराथी यांना राज्यस्तरीय आझाद नाट्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर पत्रकारिता अभ्यासक्रमात यश मिळवल्याबद्दल अनुराधा आहेर व अरविंद गाडेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे असीफ शेख, सादिक तांबोळी, मिर्झा अयाज बेग, हुसेन शेख, अनिल भोसले, राम सिमरे, ज्ञानेश्वर राक्षे, इरफान फिटर, जानकीराम भडकवाड, शहनाज बागवान, शंकर गायकवाड, शेख जमीर, एजाज बिल्डर, आफताफ नाईकवाडी, शाहरुख शेख, जाकीर पेंटर, नजीर पठाण, शहानू बेगमपुरे, बानोबी शेख, विनोद गायकवाड, अफसर तांबोळी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.