संघर्षातूनच समृद्धीचा मार्ग प्राप्त होतो ः डॉ. मालपाणी धांदरफळ येथील ‘रासेयो’ शिबिरात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनातील संघर्षच जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो. संघर्षातूनच समृद्धीचा मार्ग प्राप्त होतो. संघर्षाने स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त होते. जीवनातील छोटे-मोठे संघर्ष न रडता, न डगमगता जो स्वीकारतो आणि जिद्दीने, खंबीरपणाने प्रतिकूल परिस्थितित संघर्ष करतो तोच यशस्वी होतो. संघर्षाशिवाय चांगले दिवस दिसत नाहीत. संघर्षातूनच मोठे होता येते. त्यासाठी आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

संगमनेरातील शिक्षण प्रसारक संस्थेच्या धांदरफळ येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच्या ‘मुक्त चिंतन’ या विषयावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानात शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिहारीलाल डंग, उद्योजक बाळासाहेब देशमाने, भाऊसाहेब डेरे, सरपंच भानुदास शेटे, सुनील देशमुख, मनोज कवडे, शरद तोरकडी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप वलवे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. संजय मालपाणी म्हणाले, आपल्यात वेगळे काहीतरी करण्याची धमक असली पाहिजे. जीवनात काही मिळवायचे असेल, काही बनायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. आपण जेव्हा संघर्ष करुन एखादी गोष्ट मिळवतो तेव्हा त्यातला आनंद हा वेगळाच असतो. आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य देखील प्रचंड संघर्षातूनच मिळालेले आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, चाफेकर बंधू, सुखदेव, राजगुरु, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद अशा अनेक राष्ट्रभक्तांच्या संघर्षाची फलश्रुती म्हणजे आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य आहे. संघर्ष आणि बलिदानाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे मूल्य जाणले पाहिजे. स्वातंत्र्यासाठी अवलंबिलेला शांतीचा मार्ग असो वा क्रांतीचा मार्ग असो हे दोन्हीही मार्ग महान होते. आपण स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या या सर्व राष्ट्रभक्तांसमोर नतमस्तक व्हायला पाहिजे, त्यांचे स्मरण आपण करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांचे विचार आणि कार्याचा अभयास केला पाहिजे. रामायण, महाभारत, भगवद्गीतेचे माहात्म्य समजून घेतले पाहिजे. प्रास्तविक स्वयंसेविका पायल गुंजाळ व अतिथी परिचय स्वयंसेविका पूजा गुंजाळ यांनी करुन दिला. सूत्रसंचालन स्वयंसेवक सिद्धेश कुरकुटे व ऋषीकेश लामखडे यांनी केले तर आभार बाळासाहेब देशमाने यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *