भारत जोडो यात्रेत राहुल गांधींशी डॉ. जयश्री थोरातांचा संवाद ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयी केली सविस्तर चर्चा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. या यात्रेत कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात सहभागी झाल्या असून त्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या समवेत ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नांवर संवाद साधला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात सहभागी झाल्या. यावेळी समवेत भारत जोडोचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होते. या पदयात्रेतील भेटीदरम्यान खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत डॉ. जयश्री थोरात यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा केली. शहरी भागातील तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्य विषयक जास्त समस्या आहेत. मात्र त्यांना मूलभूत सुविधा जास्तीत जास्त देण्याकरीता शासन व्यवस्थेकडून अधिक ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे. यासाठी काही सूचनांसह ब्लड कॅन्सरसह विविध कॅन्सरबाबतची जनजागृती व उपायोजनांबाबतही त्यांनी चर्चा केली.
यानंतर बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, स्वतः राहुल गांधी हे खूप हुशार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्राची त्यांना जाण आहे. त्यांनी ब्लड कॅन्सरसह आरोग्याच्या विविध प्रश्नांविषयी अधिक माहिती घेतली. धार्मिकता व मनभेदाचे राजकारण हाच भारताला मोठा रोग जडलेला असून त्यापासून देशाला वाचवण्याकरीता खासदार राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा आहे. धार्मिकतेच्या राजकारणाविरुद्ध सर्व तरुणांनी एकत्र येणे गरज आहे. एकतेचा व प्रेमाचा संदेश देणारी ही भारत जोडो यात्रा असून याला तरुणाईचा यामुळेच मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या.