संगमनेर तालुका पोहोचला चौतिसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर! शहरातील दहा जणांसह आजही आढळले तालुक्यात एकोणपन्नास रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सप्टेंबर महिन्यात वाढलेला तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाचा सिलसिला ऑक्टोबरमध्येही सुरुच आहे. दररोजच्या रुग्णसंख्येतून ग्रामीण क्षेत्रातील नवनवीन रुग्णांसह एखाद् दुसर्‍या नवीन गावाचीही बाधित क्षेत्रात भर पडत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या दोन महिने शहर आणि तालुक्यातील तुरळक गावांमध्ये असलेले संक्रमण आज 81 टक्के तालुक्यात पोहोचले आहे. या श्रृंखलेत आजही 49 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने 34 व्या शतकाचा उंबरठा गाठला आहे. आज खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे केलेल्या तपासणीतून शहरातील दहा जणांसह 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 3 हजार 396 वर जावून पोहोचली आहे.


गेल्या 26 ऑगस्टपासून संगमनेर तालुक्यात व त्यातही ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणात संक्रमणाला सुरुवात झाली. एकट्या सप्टेंबरमध्ये तालुक्याच्या एकुण रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 531 नवीन रुग्णांची भर पडली. ऑगस्टने वाढवलेली तालुक्यातील कोविड गती सप्टेंबरने अबाधित राखल्यानंतर आता ऑक्टोबरनेही तोच कित्ता गिरवला आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरी 49 च्या वाढीप्रमाणे 97 रुग्णांची भर पडलेली असताना आता आजही त्यात आणखी 49 जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याप्रमाणेच या महिन्यातही रुग्णगती कायम राहील असेच काहीसे चित्र महिन्याच्या सुरुवातीला दिसत आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून आठ तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 41 जणांचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालातून शहरातील दहा जणांसह तालुक्यातील 39 अशा एकूण 49 जणांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले. शहरातील जानकीनगर परिसरातील 63 वर्षीय महिला, 16 व 12 वर्षीय मुले, शिवाजीनगर परिसरातील 65 वर्षीय महिलेसह 41 वर्षीय तरुण व चार वर्षीय बालिका, पावबाकी रस्त्यावरील 38 वर्षीय तरुण व एका फ्लॉवर मिलमधील 50 वर्षीय इसमासह अन्य एक 52 वर्षीय इसम अशा शहरातील एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यासोबतच तालुक्यातील एकोणचाळीस जणांनाही संक्रमण झाल्याचे आजच्या अहवालातून समोर आल्याने तालुक्यातील रुग्ण वाढीचा वेग आजही कायम आहे.

आज तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील निर्मला नगर परिसरातील चाळीस वर्षीय महिलेसह 14 वर्षीय बालिका व सात वर्षीय बालक तसेच शिवारातील 52 व 25 वर्षीय महिलेसह 35 व 18 वर्षीय तरुण, पठार भागातील साकुर येथील 42 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगा, घारगाव येथील 38 वर्षीय तरुणासह तीस वर्षीय महिला, समनापुर येथील 55 वर्षीय महिला, निमोण मधील 50 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 45 वर्षीय तरुण हिवरगाव पावसा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव पागा येथील 36 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 75 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम, कवठे बुद्रुक येथील तेवीस वर्षीय महिला, चिकणी येथील 45 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 75 वर्षीय नागरिकासह आठ वर्षीय मुलगा, प्रतापपूर येथील 56 वर्षीय इसमासह 40 व 30 वर्षीय महिला व अकरा वर्षीय मुलगी,

कोकणगाव येथील 58 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 46 वर्षीय इसम, कोल्हेवाडी येथील 21 व 18 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 24 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 75 वर्षीय महिलेसह 60 व 49 वर्षीय इसम, देवकवठे येथील 45 वर्षीय महिला, काकडवाडी येथील 49 वर्षीय तरुण व चिंचपूर येथील 37 वर्षीय तरुण आदींचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. सरासरी रोज पन्नासच्या गतीने वाढणाऱ्या तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही तितकीच भर पडल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 396 वर जाऊन पोहोचली आहे.

गेल्या एकाच महिन्यात तालुक्यातील रुग्णसंख्येसोबतच मृत्युचा दरही वाढला आहे. 1 सप्टेंबरपासून सुरु झालेले कोविड मृत्युचे तांडव संपूर्ण महिनाभर कायम राहीले. सप्टेंबरच्या 30 दिवसांत शहरातील तिघांसह तालुक्यातील एकुण 20 जणांचे कोविडने बळी घेतले. यामध्येही मालदाड येथील 35 वर्षीय छायाचित्रकार, चंदनापूरी येथील 39 वर्षीय व सायखिंडी येथील 40 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. उर्वरीत सतरा जणांचे वय 50 पेक्षा अधिक आहे. त्यात केवळ दोघा महिलांचा समावेश आहे. एकंदरीत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वाढलेले कोविडचे संक्रमण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम असून नागरिकांनी सतर्कता न बाळगल्यास कोविडची दाहकता अशीच वाढत राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

अनलॉक प्रक्रीया सुरु झाल्यानंतर शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नागरिकांनी कोविडसोबत जगणे अपेक्षित होते. मात्र अनलॉक म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव संपल्यागत नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली, दहावे, लग्न समारंभ, श्राद्ध, वाढदिवसाच्या पार्ट्या अशा सामुदायिक कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी जमल्याने व त्यातही नियमांची पायमल्ली झाल्याने ग्रामीणभागातील संक्रमणाला गती मिळाल्याचेही सिद्ध झाले आहे. जो पर्यंत प्रत्येक नागरिक नियमांचे पालन करीत नाही तो पर्यंत कोविडचा प्रादुर्भाव रोखणं अशक्य ठरणार आहे, त्यामुळे संगमनेरकरांनी आतातरी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Visits: 26 Today: 2 Total: 117773

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *