कोणत्याही क्षणी होणार नगरपालिका निवडणुकांची घोषणा! गुरुवारच्या सर्वोच्च सुनावणीनंतर निर्णय; डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट लागून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. या दरम्यान झालेल्या विविध राजकीय घडामोडी आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी यामुळे लांबलेल्या या निवडणुका आता डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून राज्यातील 18 महानगरपालिका आणि 164 नगरपालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे समजते. त्यासाठी आयोगाकडून गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीची प्रतीक्षा केली जात असून त्यांनतर कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आपले राजकीय भविष्य चाचपडणार्यांची धावपळ वाढणार आहे.
राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचना आणि मतदारयाद्यांची कामे यापूर्वीच झालेली आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील आगामी सुनावणीनंतर अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांचा धुराळा उडण्याची दाट शक्यता नगरविकास खात्यातील सूत्रांकडूनही वर्तविण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2023 पूर्वी राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या सुमारे 28 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु असते. अशावेळी मतदान केंद्रासाठी जागा आणि यंत्रणा अपुरी पडते, त्यामुळे या परीक्षा सुरु होण्यापूर्वीच या निवडणूका पार पाडण्याचे नियोजन आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करुन व एप्रिल-मे महिन्यातील कडक उन्हाळा टाळून आगामी डिसेंबर ते पुढील वर्षीच्या फेब्रुवारी पूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका उरकण्यात येणार आहेत. मार्च 2023 नंतर राज्यातील अडीच ते तीन हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्यांच्याही निवडणुका वेळेवर घेण्याचे दिव्य आयोगाला पार करावे लागणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दरम्यान महापालिका व नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूका घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
संगमनेर नगरपालिकेवर गेल्या सुमारे वर्षभरापासून प्रशासकीय राज आहे. त्यातच वेगवेगळ्या कारणांनी निवडणूका पुढे ढकलल्या जात असल्याने इच्छुकांचा वारंवार हिरमोड होत आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने गेले वर्षभर ‘सायलेंट’ असलेले इच्छुक आता पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याने लग्न सोहळे, वाढदिवस, दुखःद प्रसंगातील गर्दी वाढणार आहे.