सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता स्थानिक दैनिकांमध्येच ः बर्दापूरकर कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; ‘अर्धापूर ते वॉशिंग्टन’मधून उलगडला जीवनप्रवास
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षण घेत असताना आपण विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करीत असतो. मात्र एकदा शिक्षण संपले आणि नोकरीला लागलं की आपली ज्ञान अपडेट करण्याची सवय बंद होते. त्यामुळे प्रत्येकाने आपले ज्ञान सतत अपडेट करीत राहावे असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी दिला.
कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे सहाव्या दिनाचे पुष्प गुंफतांना ते ‘अर्धापूर ते वॉशिंग्टन’ या विषयावर बोलत होते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात होत्या. कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात बर्दापूरकर पुढे म्हणाले की, बालवयापासून राजकीय व्यक्तिंबाबत आपल्या मनात कटुता होती. मात्र ती तेवढ्या पुरतीच प्रासंगिक रहायची. राजकारणात असलेल्या सगळ्यांविषयीच माझी तशी कधीही धारणा नव्हती. माझ्यासारख्या हजारों मुलांच्या शिक्षणाचा कोंडलेला प्रवाह बाळासाहेब पवार यांनी बाजूला केल्याने आम्हाला शिक्षण मिळाले. नाहीतर आज आम्ही काठेतरी कारकूनी काम करतांना आढळलो असतो. त्याचा परिणाम राजकारणात कार्यरत असलेल्या काही व्यक्ति खरोखरी चांगले काम करतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने मला त्यांच्याविषयी आदर निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
निमशहरी व ग्रामीण भागात राहणार्यांच्या स्थितीत आज आमुलाग्र बदल झाले आहेत. आम्ही विद्यार्थीदशेत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळत होते. शिक्षणासोबतच आई व शिक्षकांनी चांगले संस्कारही केले. म्हणूनच माझी वाणी सुसंस्कृत आणि भाषेवर प्रभुत्व गाजवणारी होवू शकली असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. आई आणि शिक्षकांच्या प्रसंगी कठोर वागण्यामध्ये जे काही दडले आहे ते माझ्या आयुष्यात मला खूप उपयोगी पडले. यावेळी त्यांनी भाषेकडे गांभीर्याने पाहण्याची गरजही व्यक्त केली. आज जागतिकीकरणामूळे शिक्षणाची अवस्था बदलली आहे. एकीकडे जागतिक दर्जाचे शिक्षण तर दुसरीकडे आपल्या रुढी-परंपरा, संस्कार आणि संचित यांनी आपल्याला काही प्रमाणात बांधून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
आज देशातील मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे. सन 1970-80 च्या दशकांतील मध्यमवर्गीय समाज अतिशय संवेदनशील होता. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या लढ्यांमध्ये हा वर्ग सामील व्हायचा. तशी परिस्थिती आज राहिली नसल्याकडे त्यांनी उपस्थित श्रोत्यांचे लक्ष्य वेधले. यामागील कारणांची मिमांसा करताना त्यांनी आजच्या मध्यमवर्गीयांच्या आर्थिकस्थितीत सुधारणा झाल्याचे सांगितले. दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहाराव व अटबिहारी वाजपेयी या दोघांचा आपल्यावर मोठा प्रभाव असल्याचे सांगत बर्दापूरकर यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींनाही यावेळी उजाळा दिला. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या काळानंतर त्यांच्याविषयी मनात द्वेष निर्माण झाला होता, मात्र त्यांना जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटलो तेव्हा मंत्रमुग्ध होवून त्यांच्याकडे फक्त बघतच राहिल्याचा किस्साही त्यांनी उपस्थितांना सांगितला.
यावेळी बोलताना बर्दापूरकर यांनी आजच्या पत्रकारिता क्षेत्रावरही सविस्तर भाष्य केले. आज मोठ्या साखळी वृत्तपत्रांमधील संपादक नावाची व्यवस्था पूर्णतः मोडकळीस आल्याचे सांगत शेपट्या कापलेले बहुसंख्य संपादक मालकांना शरण गेल्याचे ते म्हणाले. अशा काळात मोठ्या वृत्तपत्रांकडून कोणत्याही अपेक्षा बाळगता येणार नसून सामान्यांच्या अपेक्षा केवळ लहान, मध्यम आणि स्थानिक वृत्तपत्रांकडून पूर्ण होवू शकतील अशी आज स्थिती निर्माण झाल्याचेहीे त्यांनी यावेळी सांगितले.