तिसर्या राज्यस्तरीय सिनिअर योगासन स्पर्धेचे संगमनेरात आयोजन! स्पर्धा आयोजनाचा संगमनेर पॅटर्न; राज्यातून सर्व जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय स्पर्धा प्रवेशाचा मार्ग खुला करणार्या तिसर्या राज्यस्तरीय सिनिअर योगासन स्पर्धेचे संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधून दिडशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून महिन्याच्या अखेरीस राजस्थानमध्ये होणार्या राष्ट्रीय स्पर्धेची कवाडेही उघडली जाणार आहेत. यापूर्वी ध्रुव ग्लोबल स्कूलने पहिल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे यजमानपदही भूषविले होते. त्यावेळच्या यशस्वी आयोजनाच्या बळावर संगमनेरला पुन्हा राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाची संधी मिळाली आहे, त्यातून स्पर्धा आयोजनाचा संगमनेर पॅटर्नही विकसित झाला आहे.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहंमहाराष्ट्र योग परिषद व ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी असोसिएशनचे राज्याध्यक्ष बापू पाडळकर, उपाध्यक्ष सतीश मोहगावकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, खजिनदार नीलेश पठाडे, तांत्रिक समितीचे सचिव डॉ. वशिष्ठ खोडस्कर, स्पर्धा समितीचे संचालक उदय कहाळेकर व ध्रुव ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापक सचिन जोशी आदिंची उपस्थिती होती.
या स्पर्धेत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधून 152 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे, त्यात 73 मुलींचा समावेश आहे. या स्पर्धकांसोबत त्यांचे नव्वदहून अधिक प्रशिक्षक, त्यांचे पालक अशा सुमारे चारशेहून अधिक जणांच्या मांदियाळीने ध्रुव ग्लोबलचा परिसर गजबजला असून ध्रुवच्या दोन स्वतंत्र क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने या स्पर्धेसाठी तज्ज्ञ पंचांची नियुक्ती केली असून त्यांच्याच देखरेखीखाली या स्पर्धा पार पडत आहेत. शुक्रवारी या दोन दिवशीय स्पर्धेचा समारोप होणार असून या स्पर्धेत विजयी ठरणार्या स्पर्धकांची निवड चालू महिन्याच्या अखेरीस राजस्थानात होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे.
योगासनांचा खेळात समावेश झाल्यानंतर राज्यपातळीवरील स्पर्धेच्या आयोजनाचा मान दुसर्यांदा संगमनेरला मिळाला आहे. सुमारे दीडशे स्पर्धकांचा सहभाग असलेली ही स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या दोन स्वतंत्र क्रीडा संकुलात एकाचवेळी घेण्यात येत आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक, प्रशिक्षक व पालकांच्या निवास व्यवस्थेसह त्यांच्या नाश्ता व जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीचे अचूक आणि उत्तम नियोजन झाल्याने अतिशय उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धा पार पडत आहेत. या माध्यमातून अशाप्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनाचा नवा ‘संगमनेर पॅटर्न’ही विकसित झाला आहे.
वर्ल्ड योगासना व राष्ट्रीय योगासन स्पोर्ट फेडरेशनचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव म्हणून काम करणार्या डॉ.संजय मालपाणी यांनी गेल्या दोन वर्षांत योगासनांसाठी केलेल्या अफाट कामाची दखल घेत त्यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी योगासन नियोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.