आत्महत्येसाठी चक्क तोंडात जिलेटीनच्या कांडीचा केला स्फोट! अकलापूर शिवारात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने उडाली खळबळ


नायक वृत्तसेवा, घारगाव
देशभरात गेल्या तीन महिन्यांपासून सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या चर्चा रंगलेल्या असतांना संगमनेर तालुक्यातील पठारभागात मात्र आत्महत्या करण्याचा नवा आणि अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुरुंगाच्या कांड्याचा वापर करीत 46 वर्षीय इसमाने स्वतःच्या चेहर्‍याच्या चिंधड्या उडवित आपला जीव त्यागला. या प्रकाराने केवळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सुखदेव किसन मधे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकमुखी दत्तात्रयांच्या पावन वास्तव्याने पुलकीत झालेल्या पठारावरील अकलापूर शिवारात गाढवलोळी आदिवासी वस्तीवर मंगळवारी रात्री सदरचा प्रकार घडला. सुखदेव किसन मधे (वय 46) हे आपली पत्नी, 21 वर्षीय मुलगा अनिकेत व सून यांच्यासह येथे वास्तव्यास आहे. आधीच तापट स्वभाव आणि त्यातच त्यांना असलेले दारुचे व्यसन यामुळे नशेत असतांना त्यांच्याकडून नेहमी शिवीगाळ व भांडणासारखे प्रकार घडत असतं, तसे कालही घडले.


मंगळवारी (ता.29) रात्री साडेआठच्या सुमारास रोजच्या सवयीप्रमाणे सुखदेव मधे दारुच्या नशेत घरी परतले. त्यावेळी जेवणाची वेळ असल्याने त्यांच्या मुलाने त्यांना ‘थाळा लावायचा का?’ म्हणून विचारणा केली असता त्यांनी जेवणास नकार देत घराच्या अंगणात टाकलेल्या बाजावर पथारी ठोकली. दरम्यानच्या काळात त्याचा मुलगा व सून त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळातच सुखदेव मधे व त्यांच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले, दारुच्या नशेत असलेले सुखदेव मधे मोठ्याने ओरडून शिवीगाळ करीत असल्याने त्या आवाजाने त्यांचा मुलगा घराबाहेर आला व त्याने वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.


त्यामुळे त्याने आईला स्वतःच्या खोलीत झोपायला बोलावून खोलीचे दार बंद केले. यानंतर सुखदेव मधे दारापुढे लावलेल्या दुचाकीवर बसले, मात्र काहीवेळातच तेथून दुसर्‍या खोलीत गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या खोलीतून स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने घाबरुन त्यांच्या मुलाने खोलीचा दरवाजा उघडून वडिल असलेल्या खोलीकडे धाव घेतली असता समोरचे दृष्य पाहून त्याला चक्कर आली.


पत्नीसोबतच्या भांडणातून रागाचा पारा शिगेला पोहोचलेल्या सुखदेव मधे यांनी विहिरीच्या कामासाठी घरात आणलेल्या सुरुंगाच्या कांड्यांमधील एक कांडी आपल्या तोंडात धरुन त्याला विद्युत पुरवठ्याच्या वायरचा स्पर्श केला, त्यामुळे सर्कीटपूर्ण होवून त्याचा जोरदार स्फोट झाला आणि त्यातून सुखदेव मधे यांच्या संपूर्ण चेहर्‍याच्या अक्षरशः चिंधड्या उड्याल्या. यास्फोटाने जागीच गतप्राण झालेल्या मधे यांच्या चेहर्‍याचे रक्त आणि मांस खोलीत सर्वत्र उडालेले होते. या भयंकर प्रकाराने घाबरलेल्या त्यांच्या मुलाने धावत जावून आपल्या नातेवाईकांना ही घटना सांगीतली व घारगाव पोलिसांना खबर दिली.


घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबदास भुसारे, सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे, कर्मचारी राजेंद्र लांघे, किशोर लाड व प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मयत झालेल्या सुखदेव मधे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. आज सकाळी शिर्डीहून बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते, त्यावेळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक रुपाली काळे व संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक रोशन पंडितही घटनास्थळी उपस्थित होते.

तीन महिन्यांपूर्वी 14 जूनरोजी मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणाच्या तपासातील नाट्यमय घडमोडी, तेव्हापासून त्याची मिस्ट्री शोधण्यासाठी काही माध्यमांकडून सुरु असलेला प्रकार आणि एकंदरीत या आत्महत्येतून राज्याच्या राजकारणातील ढवळून निघालेले वातावरण असे सर्व चित्र असतांना संगमनेरातील एका छोट्याशा आदिवासी वस्तीवर घडलेला हा धक्कादायक प्रकार राज्यात खळबळ उडवून देणारा आहे. मयत इसमाने स्वतःचा जीव त्यागण्यासाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करुन आपल्याच चेहर्‍याच्या चिंधड्या उडवण्याचा हा प्रकार राज्यात कदाचित पहिल्यांदाच घडला असावा.

Visits: 114 Today: 2 Total: 1108231

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *