खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ किरीट सौमय्यांच्या प्रतिमेचे दहन! संगमनेरात संतप्त शिवसैनिक रस्त्यावर; जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंची उपस्थिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) रविवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच केंद्र सरकार तपास यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांची मुस्कटदाबी करीत असून शिवसेना अशा प्रकारांना भीक घालीत नसल्याचे सांगत आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. संगमनेरातील जुन्या-नव्या शिवसैनिकांनी बसस्थानक चौकात एकत्रित होत जोरदार घोषणाबाजी करीत भाजपनेते किरीट सौमय्या यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी संतप्त शिवसैनिक घोषणाबाजी करीत महामार्गावर आल्याने काहीकाळ वाहतूकीचाही खोळंबा झाला होता. या आंदोलनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांची संगमनेरातील उपस्थिती लक्षणीय ठरली.

भाजपाकडून सातत्याने पक्षाला कमी लेखण्यात येत असल्याचा आरोप करीत 2019 साली शिवसेनेने आपल्या 25 वर्षांच्या मैत्रीवर पाणी फिरवून भाजपाशी असलेले राजकीय संबंध तोडले. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या आपल्या पारंपरिक राजकीय विरोधकांशी संधान साधून राज्यात महाविकास आघाडीचे नवे सूत्र निर्माण केले. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यातूनच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरुनही भरतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यामुळे भाजपच्या विविध नेत्यांनी सुरुवातीपासून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यास व त्या माध्यमातून सक्तवसुली संचनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या संस्थांचा राज्यात मुक्त वापर सुरु केला.

त्याला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने खासदार संजय राऊत यांच्यावर राज्य सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवली. मागील 32 महिन्यांपासून त्यांनीही ती अतिशय समर्थपणे पेलतांना भाजपच्या प्रत्येक आरोपाला व कारवाईला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यातून भाजप आणि सेना यांच्यातील संबंध आणखीन ताणले जावून राज्यात केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली. भाजप नेते किरीट सौमय्या यांनी तत्कालीन मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब यांच्यासह खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरही सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासात सुमारे बाराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी त्यात थेट संजय राऊत यांचे नाव घेतले.

त्यांच्या या आरोपांनंतर सक्तवसुली संचनालयाने कारवाईची सूत्र हाती घेत संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली, तर संजय राऊत यांच्या मालमत्तांवरही टाच आणली. या दरम्यान राऊत यांना वेळोवेळी समन्स बजावून चौकशीसाठीही बोलावण्यात आले. यापूर्वी सलग 10 तास त्यांची ईडी कार्यालयात चौकशी झाल्यानंतर त्यांना 27 जुलै रोजी पुन्हा हजर होण्यास सांगण्यात आले होते, मात्र आपणास 7 ऑगस्ट रोजी बोलवावे असे सांगत त्यांनी चौकशीला जाणे टाळले. त्याचा परिणाम रविवारी (ता.31) ईडीने सकाळी सात वाजताच त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानावर छापा घातला. सलग 9 तास त्यांच्याच घरात चौकशी केल्यानंतर सायंकाळी त्यांना ताब्यात घेवून ईडी कार्यालयात नेण्यात आले व मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.

खासदार संजय राऊत यांच्या अटकेचे वृत्त राज्यात पसरताच अनेक ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन त्या विरोधात आंदोलने सुरु केली. संगमनेरातही अनेक जुन्या व नव्या शिवसैनिकांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बसस्थानक चौकात गर्दी केली. विशेष म्हणजे गेल्याकाही वर्षांपासून केवळ पक्षाचे मोठे नेते संगमनेरात आल्यानंतर अवतरणारे जिल्हाप्रमुख रावसहेब खेवरे आज मात्र भल्या सकाळीच संगमनेरात पोहोचले होते. त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधीत बसस्थानकावरील आंदोलनातही सहभाग घेतला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी भाजपनेते किरीट सौमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले. शिवसैनिकांचा हा जथ्था घोषणाबाजी करीत काहीकाळ पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरही आल्याने काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. सुमारे अर्धातास चाललेल्या या आंदोलनाची शांततामय सांगता झाली. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. आजच्या आंदोलनात जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंसह, नागपूरचे (दक्षिण) संपर्कप्रमुख नरेश माळवे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, प्रसाद पवार, यासोबतच युवासेनेचे अमित चव्हाण, जयवंत पवार, अॅड. दिलीप साळगट, अमोल कवडे, रमेश काळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांच्यासह जुने व नवे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

