ऐन पावसाळ्यात पठारभागातील गावे तहानलेलीच! पंधरा गावांसह सत्तावीस वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

नायक वृत्तसेवा, घारगाव
सध्या पावसाळा सुरू आहे. मात्र अद्यापही म्हणावा संगमनेर तालुक्यातील पठारभागात मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे येथील पाण्याचे उद्भव अजूनही कोरडेठाक आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पंधरा गावांसह सत्तावीस वाड्यांना अकरा टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. यासाठी दैनंदिन 35 खेपा होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे व टंचाई कक्ष प्रमुख संजय अरगडे यांनी दिली.

संगमनेर तालुक्यचा पठारभाग म्हणल की नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते. याचा प्रत्यय आता पावसाळ्यातही येवू लागला आहे. सध्या सर्वत्र सर्वदूर पाऊस होत आहे. मात्र, पठारभागात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. केवळ संततधार सुरू असल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळत आहे. परंतु, पाण्याचे उद्भव अजूनही कोरडेठाक असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एरव्ही उन्हाळ्यात गावांसह वाड्या-वस्त्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा बसतात. मात्र, आता पावसाळ्यातही झळा बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

पठारभागातील पोखरी बाळेश्वर, सावरगाव घुले, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, दरेवाडी, पिंपळगाव देपा, डोळासणे यांसह पानोडी, खरशिंदे, खांबे, सायखिंडी आदी गावांसह 27 वाड्यांना पाणी टंचाई भासत असल्याने 20 हजार 43 लोकसंख्येला अकरा टँकरद्वारे दैनंदिन 35 खेपांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाला तरच हे पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद होण्याची शक्यता आहे.
