तीन तालुक्यांना वरदान ठरलेला आढळा प्रकल्प ओसंडला! पाणलोटात पावसाचे धुमशान सुरुच; दोन दिवसांत म्हाळुंगी नदीही वाहती होणार?

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टर जमीनीसाठी वरदान ठरलेला आढळा मध्यमप्रकल्प अखेर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ओसंडला. त्यामुळे या तिनही तालुक्यातील पंधरा गावांमध्ये जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले असून चालू हंगामात पहिल्यांदाच आढळा नदी वाहती झाली आहे. आढळा खोर्‍यासह भोजापूर लघु प्रकल्पाच्या पाणलोटातही पाऊस टिकून आहे, त्यामुळे या जलाशयातील पाणीसाठाही 80 टक्क्याहून अधिक झाला असून पाऊस कायम राहील्यास येत्या दोन दिवसांत म्हाळुंगी नदीही वाहती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्याच्या उत्तरभागासह पश्चिम पट्ट्यातील पावसाचा जोर आजही कायम असून पश्चिमेतील तीनही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासून अपवाद वगळता लाभक्षेत्रातील बहुतेक तालुक्यात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.

1976 साली पाणी साठवण्यास सुरुवात झालेला आढळा नदीवरील देवठाण गावात बांधलेला आढळा जलाशय यंदा सत्ताविसाव्यांदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आढळा धरणाचे संपूर्ण बांधकाम मातीत केलेले आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 1 हजार 60 दशलक्ष घनफूट असून या धरणाच्या पाण्यावर अकोले, संगमनेर व सिन्नर (जि.नाशिक) या तीन तालुक्यातील 3 हजार 914 हेक्टर रब्बीचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे, याशिवाय 780 हेक्टर खरीप पिकांनाही या धरणातील पाण्याचा लाभ मिळतो. 40 मीटर उंचीच्या या धरणाची एकूण लांबी 623 मीटर असून सांडव्याची लांबी 144 मीटर आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 177 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे.

धरणाच्या सांडव्याची वहन क्षमता 1 हजार 582 घनमीटर (54 हजार 900 क्यूसेक) इतकी असून धरणाच्या दोन कालव्यांद्वारा सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे असून डाव्या कालव्याची एकूण लांबी 8.80 किलोमीटर आहे. 42 क्यूसेक वेगाने पाणी वाहण्याची क्षमता असलेल्या या कालव्याद्वारे सिन्नर तालुक्यातील कासारवाडी व नळवाडीसह अकोले तालुक्यातील डोंगरगाव व संगमनेर तालुक्यातील चिकणी, निमगाव भोजापूर, जवळे कडलग व राजापूर या गावांतील 1 हजार 492 हेक्टर क्षेत्र, तर 11.80 किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यातून 68 क्यूसेक वेगाने अकोले तालुक्यातील देवठाण, हिवरगाव आंबरे, वीरगाव, पिंपळगाव निपाणी व गणोरे, संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, जवळे कडलग व धांदरफळ या भागातील 2 हजार 422 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यात आले आहे.

आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आढळा धरणाने 1 हजार 60 दशलक्ष घनफूट ही आपली सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर सांडव्यावरुन 150 क्यूसेक वेगाने ओव्हरफ्लोचे पाणी आढळा नदीपात्रात कोसळत आहे. त्यामुळे चालू हंगामात पहिल्यांदाच आढळा वाहती झाली असून लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आढळा धरणासह भोजापूर जलाशयाच्या पाणलोटातही पावसाचा जोर टिकून आहे. त्यामुळे 500 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या जलाशयात आज सकाळी 6 वाजेपर्यंत 290 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले होते. गेल्या चोवीस तासांत या जलाशयाच्या पाणीसाठ्यात 55 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले असून अशीच स्थिती राहिल्यास पुढील दोन दिवसांत हा जलाशयही ओसंडून वाहण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या दोनच दिवसांत तालुक्याच्या उत्तरेतील धरणांची स्थिती समाधानकारक झालेली असताना गेल्या आठवड्याभरापासून मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात तुफानी जलवृष्टी सुरुच आहे. गेल्या चोवीस तासांत मुळा खोर्‍यातील पावसाचा जोर आणखी वाढल्याने आज सकाळी सहा वाजता कोतुळ नजीकच्या मुळापात्रातून 17 हजार 737 क्यूसेकचा प्रचंड प्रवाह वाहत आहे. त्यामुळे मागील चोवीस तासांतच मुळा धरणात विक्रमी 1 हजार 170 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांच्या पाण्यालोटातील पावसाचा जोर मात्र काहीअंशी मंदावला आहे. त्याचा परिणाम धरणातील नवीन पाण्याच्या आवकवर झाला असून 24 तासांत भंडारदर्‍यात 704 तर निळवंड्यात 518 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे.

आज सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत घाटघर येथे 278 मि.मी., रतनवाडी 274 मि.मी., भंडारदरा 254 मि.मी., वाकी 224 मि.मी., निळवंडे 68 मि.मी., आढळा 20 मि.मी., कोतूळ 36 मि.मी., अकोले 31 मि.मी., संगमनेर 5 मि.मी., श्रीरामपूर व राहुरी प्रत्येकी 4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 13 हजार 53 दशलक्ष घनफूट (50.20 टक्के), भंडारदरा 7 हजार 182 दशलक्ष घनफूट (65.06 टक्के), निळवंडे 5 हजार 689 दशलक्ष घनफूट (68.37 टक्के), आढळा 1 हजार 60 दशलक्ष घनफूट (ओव्हर फ्लो) व भोजापूर 290 दशलक्ष घनफूट (80.30 टक्के) इतका झाला आहे.


तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून तुफान जलवृष्टी होत असल्याने भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांतील पाणी पातळी वेगाने वाढत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर टिकून राहण्याचा अंदाज असल्याने सुरक्षितता म्हणून आज दुपारी 12 वाजता निळवंडे धरणातून 2 हजार 300 क्यूसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 118841

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *