सर्व सामान्यांनी कामासाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा ः गडाख
सर्व सामान्यांनी कामासाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा ः गडाख
नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील पंचायत समितीच्या समाजकल्याण व शिक्षण विभागाच्यावतीने गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांसह लाभार्थ्यांना युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते विविध साहित्यांचे आज (मंगळवार ता.29) करण्यात आले. दरम्यान, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून उपेक्षित व वंचित घटकांना लाभ देण्याचा माझा प्रयत्न असून कोणाचे काम असेल तर त्यांनी इतरांची मध्यस्थी न करता थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही गडाख यांनी यावेळी बोलताना केले.
नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या कार्यक्रमास सभापती रावसाहेब कांगुणे, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे, विक्रम चौधरी, रवींद्र शेरकर, दादासाहेब एडके, गटविकास अधिकारी शेखर शेलार, जिल्हा समाजकल्याण विभागाचे निरीक्षक बाबासाहेब देव्हारे, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यावेळी उपस्थित होते. तालुक्यात 361 शाळांमधील 444 विद्यार्थ्यांना नेवासा शिक्षण विभागाच्यावतीने सर्वेक्षण करून सायकलसह 21 प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यात प्रातिनिधिक स्वरूपात 29 लाभार्थी विद्यार्थ्यांना येथे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रेवणनाथ पवार यांचा गौरव उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी शिक्षण विभागाच्या हेमलता गावंडे यांनी आभार मानले.