गुरुचरणी लीन होण्यासाठी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी! संगमनेरच्या साई मंदिरात मांदियाळी; अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला मोठे महत्त्व आहे. आषाढ शुद्ध पोर्णिमेचा दिवस देशभरात गुरुपोर्णिमा म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या दिवशी भाविक आपल्या गुरुस्थानी असलेल्या साधूसंतांसह आई, शिक्षक व ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाला दिशा दाखवली, आकार दिला अशा महनीय व्यक्तींसमोर नतमस्तक होवून त्यांचा आशीर्वाद घेतात. संगमनेरात या उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. प्रवराकाठावरील विविध मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रिघ लागल्याचे दृष्य आहे. साईबाबा मंदिरात तर गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरु असून आज या सर्व कार्यक्रमांची महाप्रसादाने सांगता होणार आहे. त्यासोबतच शहर व परिसरातील विविध मंदिरांमध्येही धार्मिक अनुष्ठान होत असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. संगमनेरात साईबाबांसह स्वामी समर्थ व गजानन महाराजांची मंदिरे असून गंगामाई मंदिरात सीताराम बाबा तर हनुमान टेकडीवर बहिरेबाबांची समाधी आहे. याठिकाणीही गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात येतो. चंद्रशेखर चौकातील साटमबाबांच्या मठामध्येही आजच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. अनेकजण गुरुस्थानी असलेल्या आपल्या इष्टांचे विधीवत पाद्यपूजन करतात. संगमनेरला मोठा धार्मिक वारसा लाभलेला असल्याने शहर व तालुक्यातील जवळजवळ सर्वच मंदिरांमध्ये गुरुपोर्णिमा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते.

तीन दशकांपूर्वी संगमनेरात उभ्या राहिलेल्या साईबाबांच्या एकमेव मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठी धूम असते. या मंदिरात प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसापूर्वीच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने साईचरित्राचे सामूदायिक पद्धतीने पारायण करतात. गुरुपोर्णिमेच्या दिवशी शेवटचा 53 वा अध्याय पठण करुन पारायण सोहळ्याची सांगता होते. पारायण करणार्या सर्व साईभक्तांच्या हस्ते पहाटे श्रींच्या मूर्तीला लघुरुद्राभिषेक घातल्यानंतर सामुदायिक सत्यनाराणपूजा होते. दुपारी माध्यान्नाला साईबाबांची आरती होवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात येते. दरवर्षी सुमारे 12 ते 15 हजार भाविक या ठिकाणी येवून साईबाबांचे दर्शन घेतात व महाप्रसाद घेवून स्वतःला धन्य समजतात.

यासोबतच गंगामाई घाटावरील सीताराम बाबांच्या समाधीस्थळीही आज मोठी गर्दी असते. संत निरंकारी भक्तमंडळाकडून दरवर्षी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने होणारा येथील कार्यक्रम संगमनेरात चर्चेचा विषय असतो. त्यालगतच हनुमान टेकडीवरील मारुती मंदिरातही भाविकांची मोठी रेलचेल असते. या मंदिरात पूर्वी वास्तव्य असलेल्या बहिरेबाबांना मानणारा मोठा वर्ग संगमनेरात आहे. बाबांच्या निधनानंतर त्यांची समाधी याच टेकडीवर बांधण्यात आली, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांचे अनुयायी समाधीस्थळी येवून दर्शन घेतात. त्यांच्यासाठी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शहरातील स्वामी समर्थ सेवा केंद्र, साईनगरमधील गजानन महाराजांचे मंदिर यासह विविध मंदिरातही आजच्या दिवशी भाविकांची मोठी रेलचेल असते.
