अकोले तालुक्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचे थैमान! रतनवाडीत साडेबारा इंच पाऊस; भंडारदर्याचा साठा निम्म्यावर तर आढळेसह भोजापूरात आवक वाढली
नायक वृत्तसेवा, अकोले
अवघ्या आठ दिवसांच्या वास्तव्याने जिल्ह्याचा नूर पालटणार्या पावसाला धरणांच्या पाणलोटात पुन्हा एकदा जोर चढला आहे. संपूर्ण पाणलोटात तुफान गतीने कोसळणार्या वरुणराजाने या हंगामातील पहिला विक्रम नोंदविला असून गेल्या चोवीस तासांत एकट्या रतनवाडीत तब्बल 312 मिलीमीटर (साडेबारा इंच) इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. चालू हंगामात इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस नोंदविला जाण्याची ही पहिलीच घटना असून या पावसाने भंडारदर्याच्या पाणीसाठ्यात 552 दशलक्ष घनफूटाची भर घातली असून धरणाचा पाणीसाठाही 50 टक्क्यांच्या पुढे नेला आहे. मुळा, निळवंडे, आढळा व भोजापूर धरणांच्या पाणलोटातही पावसाचा जोर वाढला असून यासर्व धरणांचे पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचले आहेत. आत्तापर्यंत तालुक्यातील आठ लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब झाले असून सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे.
मागील आठवड्यात सक्रीय झालेल्या वरुणराजाने जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील वातावरण बदलून टाकले आहे. रविवारपर्यंत केवळ मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात बरसणार्या आषाढसरींनी आता जवळपास संपूर्ण तालुक्याच्या कक्षा व्यापल्याने उत्तरेकडील आढळा खोर्यातही चैतन्याचे झरे वाहू लागले आहेत. आढळा खोर्यातील 146 दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाडोशी व 71 दशलक्ष घनफूट क्षमतेचा सांगवी लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडल्याने आढळानदी दुथडी भरुन वाहू लागली असून 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणाचा पाणीसाठा अवघ्या चोवीस तासांतच समाधानकारक अवस्थेत पोहोचला आहे.
गेल्या 48 तासांपासून नाशिक जिल्ह्यातही सर्वदूर तुफान जलवृष्टी सुरु असल्याने नाशिक व नगर जिल्ह्याच्या हद्दिवरील 500 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भोजापूर प्रकल्पात एका रात्रीत 115 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षीही म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहण्याच्या आशा निर्माण झाल्या असून नदीपात्रात जागोजागी झालेली अतिक्रमणे आणि त्यातून फोफावलेली मानवी वस्ती यामुळे पूरस्थितीत जीवितहानी होण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाची धावपळही वाढली आहे. सध्या भोजापूर प्रकल्पात 134 दशलक्ष घनफूट (37.12 टक्के) पाणीसाठा आहे. पावसांत सातत्य राहिल्यास येत्या काही दिवसांतच हा लघुप्रकल्प तुडूंब होण्याची शक्यता आहे.
निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरही आषाढ सरींचे तांडव सुरु असून कृष्णवंतीने आपले दोन्ही काठ व्यापले आहेत. या नदीवर रंधा धबधब्याजवळ असलेला 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय दोन दिवसांपूर्वीच ओसंडल्याने या जलाशयाच्या भिंतीवरुन 1 हजार 22 क्यूसेक वेगाने निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरु आहे. मागील चोवीस तासांत निळवंड्याच्या एकूण जलसाठ्यात 379 दशलक्ष घनफूटाची भर पडली असून धरणाची पाणीपातळी 55 टक्क्यांच्या पुढे सरकली आहे. पावसाचा जोर टिकून राहील्यास भंडारदर्यातून विद्युतगृहासाठी पाणी सोडले जाण्याची शक्यता असून असे घडल्यास निळवंडे धरणातील पाण्याची आवक जलदगतीने वाढू शकते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निळवंडे धरणात 43 टक्के अधिक पाणीसाठा आहे.
भंडारदरा व मुळा या दोन्ही धरणांच्या विस्तीर्ण पाणलोटात गेल्या आठ दिवसांपासून तुफान जलधारा कोसळत आहेत. त्याचा परिणाम या दोन्ही मोठ्या धरणांमध्ये वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. या हंगामातील पहिला विक्रम रतनवाडीने नोंदविला असून आज सकाळी 8 वाजता संपलेल्या अवघ्या 24 तासांत या भागात तब्बल साडेबारा इंच (312 मि.मी.) पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच घाटघर, पांजरे व भंडारदरा परिसरातही पावसाचा जोर टिकून असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असून चोवीस तासांत 552 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. गेल्या 1 जूनपासून आत्तापर्यंत धरणात 3 हजार 320 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. गेल्यावर्षी आजरोजी धरणात 4 हजार 738 दशलक्ष घनफूट पाणी होते.
मुळा खोर्यातही सर्वदूर मान्सून व्यापला असून हरिश्चंद्रगड, पाचनई, कोथळे, पेठेचीवाडी, लहीत, खडकी अशा सगळ्याच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. भंडारदर्याच्या तुलनेत मुळा खोर्यात सोमवारी पावसाला अधिक जोर होता. सोमवारी सायंकाळी कोतुळनजीकच्या मुळानदीपात्रातून 10 हजार 738 क्यूसेक वेगाने पाणी धरणाकडे झेपावत होते, मात्र रात्री पावसाचा जोर काहीसा मंदावल्याने आज सकाळी 8 वाजता धरणाच्या दिशेने जाणार्या पाण्यात घट होवून 8 हजार 28 क्यूसेकचा प्रवाह वाहत होता. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणाच्या जलसाठ्यात 747 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले असून धरणाचा पाणीसाठा समाधानकारक अवस्थत पोहोचला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठा 9 हजार 320 दशलक्ष घनफूट होता.
एकीकडे अकोले तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटात मान्सूनचा तळ पडल्याचे सुखदायी चित्र दिसत असतांना दुसरीकडे लाभक्षेत्रातही सर्वदूर रिमझिम पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून आरोग्य विषयक तक्रारी वाढू लागल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी होवू लागली आहे. गेल्या चोवीस तासांत उत्तरनगर जिल्ह्यात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे – रतनवाडी 312 मि.मी., घाटघर 146 मि.मी., भंडारदरा 127 मि.मी., वाकी 93 मि.मी., निळवंडे 68 मि.मी., आढळा 22 मि.मी., कोतुळ 17 मि.मी., अकोले 24 मि.मी., संगमनेर 17 मि.मी., श्रीरामपूर 22 मि.मी., राहाता 11 मि.मी., कोपरगाव 13 मि.मी., राहुरी 04 मि.मी. व नेवासा 18 मि.मी. धरणातील पाणीसाठे – मुळा 10 हजार 703 दशलक्ष घनफूट (41.78 टक्के), भंडारदरा 5 हजार 537 दशलक्ष घनफूट (50.16 टक्के), निळवंडे 4 हजार 605 दशलक्ष घनफूट (55.35 टक्के), आढळा 705 दशलक्ष घनफूट (66.51 टक्के) व भोजापूर 134 दशलक्ष घनफूट (37.12 टक्के).
अवघ्या पाच दिवसांपूर्वी अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुक्काम ठोकणार्या मान्सूनने आता तालुक्याचा उत्तर-पश्चिम भागही व्यापला आहे. सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात आषाढसरी कोसळत असल्याने मोठ्या धरणांतील पाणीसाठे वाढू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत मुळा खोर्यातील आंबित, शिरपुंजे, कोथळे व पिंपळगांव खांड, निळवंडेच्या पाणलोटातील वाकी आणि टिटवी तर आढळा खोर्यातील पाडोशी व सांगवी हे आठ प्रकल्प तुडूंब झाल्याने जिल्ह्यातील मो या धरणांमधील पाण्याची आवकही वाढली आहे.