वांबोरी येथे तरुणांकडून रस्त्यावर रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण
वांबोरी येथे तरुणांकडून रस्त्यावर रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण
तात्काळ रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी येथे तरुणांनी वांबोरी-डोंगरगण-नगर रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी प्रशासनाचा जोरदार निषेध करून, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
सध्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनही याकडे कानाडोळा करत आहे. यामध्ये वांबोरी-डोंगरगण-नगर रस्त्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. तर रस्त्यात तीन ते चार फुटांपर्यंतचे खड्डे आहेत. वांबोरी शहरात मोठी बाजारपेठ असल्याने कायमच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. तसेच परिसरात केएसबी कंपनी, प्रसाद शुगर कारखाना, बाजार समिती यांची वाहतूकही याच रस्त्याने असते. परिसरातील पिंपळगाव, आढाववाडी, डोंगरगण, मांजरसुंभा, पाची महादेव या गावातील नागरिकांना वांबोरी व राहुरीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. कुक्कडवेढे, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, कात्रड, चेडगाव, उंबरे, ब्राह्मणी या गावांना अहमदनगरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने रोज शेकडो वाहने धावतात.
परंतु, रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने खड्ड्यांमुळे रोज अपघात घडत आहेत. वाहनांचे स्पेअर पार्ट व प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. तर गंभीर जखमी प्रवाशांना प्राणाला मुकावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला अनेकदा तक्रारी करूनही खड्ड्यांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे संतप्त तरुणांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामध्ये विष्णू ढवळे, रंगनाथ गवते, अशोक तुपे, दीपक साखरे, राम क्षीरसागर, आदेश सत्रे व इतर तरुणांनी सहभाग घेतला. आता तरी झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन जागे होईल आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करतील अशी अपेक्षाही तरुणांनी व्यक्त केली आहे.